नगरकरांसाठी मोठी बातमी, जिल्ह्यात साडेतीन हजार कोटींचे प्रकल्प उभारले जाणार…

  • Written By: Published:
नगरकरांसाठी मोठी बातमी, जिल्ह्यात साडेतीन हजार कोटींचे प्रकल्प उभारले जाणार…

Uday Samant : अहिल्यानगर परिसरात 3 हजार 500 कोटींचे प्रकल्प उभे राहणार असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. दावोस येथे देखील जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी करार करण्यात आल्याची माहिती, मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. राज्याचे उद्योगमंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते अहिल्यानगर येथील 100 व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचे स्व.सदाशिव अमरापूरकर नाट्यनगरी येथे शानदार उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्राची लोककला सर्वदूर पोहोचविण्यासाठी राज्यातील गड-किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा लोककलांचा माध्यमातून सादर करण्याबाबत लवकरच प्रयत्न करण्यात येईल, असे सामंत यावेळी म्हणाले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अहिल्यानगर उपनगर शाखेतर्फे आयोजित या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap), अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) , 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे प्रेमानंद गज्वी, नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.बापूसाहेब कांडेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, शिरीष मोडक, अजित भुरे, दिलीप कोरके, दीपा क्षीरसागर, प्रा.प्रसाद बेडेकर, नाट्य परिषदेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, हौशी आणि प्रायोगिक रंगभूमी पासून व्यावसायिक रंगभूमीकडे जाणारे कलाकार घडविण्याची गरज आहे. राज्यात लोककला, संगीत क्षेत्राच्या विकासात ज्येष्ठ कलाकारांचे मोठे योगदान आहे. शहरात नाट्यगृहाची सुविधा करतांना व्यावसायिक नाटकांवर होणारा खर्च कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी नाट्यगृहांमध्ये सौर ऊर्जेचा वापर होणे गरजेचे आहे. स्थानिक हौशी रंगभूमी कलाकारांना कमी दराने नाट्यगृह उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. मराठी भाषेच्या विकासासाठी चांगल्या सूचना आल्यास त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आमदार जगताप म्हणाले, जिल्ह्यात 22 वर्षापूर्वी नाट्यसंमेलन झाले होते. या माध्यमातून नवीन कलाकार घडविण्याचे कार्य होते. यावर्षी विभागीय नाट्यसंमेलनाचे आयोजन करतांना 101 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अहिल्यानगर शहराला मिळाल्यास त्याचे यशस्वीपणे आयोजन करण्यात येईल. शहरात नाट्यगृह उभे रहात आहे. शहराचा औद्योगिक विकासाची वेगाने होत आहे, असे त्यांनी सांगितले. नाट्यसंमेलनाच्या माध्यमातून पुढील पिढीतील कलाकार घडविण्याचे कार्य व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीच्या बाबुराव चांदेरेंच्या अडचणीत वाढ, मारहाण प्रकरणात अखेर गुन्हा दाखल

अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले, नवोन्मेष आणि नवी ऊर्जा असलेल्या रंगकर्मींसाठी ठोस कामगिरी होईल. हौशी रंगमंच सशक्त झाल्यास व्यावसायिक रंगभूमीला बळ मिळते. प्रायोगिक रंगभूमीसाठी गावोगावी मंच उभे राहिल्यास व्यावसायिक रंगभूमी सशक्त होते. राज्य पातळीवर यशस्वी एकांकिका ठिकठिकाणी दाखविण्यात याव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांवर लोककलाकारांच्या माध्यमातून शौर्याची गाथा मांडली गेल्यास नव्या पिढीला प्रेरणा मिळेल. रंगकर्मी जेवढे मोठे होतील तेवढा समाजातील एकोपा टिकून राहील, असे त्यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube