Ranjit Patil यांच्या पराभवावर आमदार गायकवाडांनी मीठ चोळले
अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघातील (Amravati Graduate Constituency) रणजीत पाटलांच्या (Ranjit patil) पराभवानंतर शिंदे गट आणि भाजप यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी रणजीत पाटील आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला आहे.
संजय गायकवाड म्हणाले, अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीदरम्यान भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. कोणत्याही प्रचाराला आम्ही जाऊ शकलो नाही. मतदार याद्या आम्हाला केवळ चार दिवसाआधी भेटल्या, असा गौप्यस्फोट केला आहे.
आमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत जो काही चमत्कार करायची संधी होती ती करायला मिळाली नाही. गावागावांमध्ये, तालुक्यामध्ये जी टीम पाहिजे होती ती आमच्यासोबत नव्हती. त्यामुळेच रणजीत पाटील यांचा पराभव झाला आहे, असे आमदार संजय गायकवाड म्हणाले.
आम्हाला विश्वासात घेतले असते तर रणजीत पाटील यांचा विजय झाला असता असे म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी रणजीत पाटलांच्या पराभवावर मीठ चोळले आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade) यांचा विजय झाला आहे. लिंगाडे यांच्या विजयामुळे अमरावती विभागात भाजपला मोठा धक्का बसला आहे. 3 हजार 382 मतांनी भाजपच्या रणजित पाटलांचा पराभव झाला आहे.