LetsUpp Special: Ranjit Patil यांचा पराभव; पण खरा धक्का फडणवीस यांना
मुंबई : अमरावती पदवीधर मतदार संघात (Amravati Graduate Constituency) भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे माजी राज्यमंत्री रणजित पाटील (Ranjit Patil) पराभूत झाले आहेत. राज्यातील भाजपासाठी सर्वात सुरक्षित मतदार संघ असताना झालेला पराभव जिव्हारी लागणारा आहे.
या निवडणुकीचे विश्लेषण म्हणजे रणजित पाटील यांचे मतदार आणि कार्यकर्त्याना गृहीत धरणे, विरोधी पक्षांच्या उमेदवाराला शुल्लक समजणे, ही चूक रणजित पाटील यांना भोवली आहे. हा पराभव म्हणजे एक प्रकारे विदर्भातील भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्ष नेतृत्वाला दिलेला इशारा आहे.
रणजित पाटील यांच्याविरोधात काँग्रेसचे धीरज लिंगाडे (Dheeraj Lingade) ही निवडणूक तशी एकतर्फी मानली जात होती, म्हणजेच कुठे तरी सेफ जागा म्हणून या निवडूकीकडे भाजपाने पाहिलं. पण या उलट काँग्रेसच्या पश्चिम विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत कमालीची एकजूट दाखवली. याचा प्रत्यय काँग्रेसच्या विजयात झाला आहे. नाना पटोले, सुनील केदार, यशोमती ठाकूर, प्रा. जगताप, अमित झनक, संजय राठोड या सर्वांनी एकसंघ आपला भाग सांभाळला.
केडर असलेल्या भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत, स्वतःचे नातेवाईक, डॉक्टर, संस्थाचालक असा ८० टक्के स्वतःची यंत्रणा रणजित पाटील यांनी मतदार संघात उभी केली. ही यंत्रणा यावेळी दिसलीच नाही.
संपर्क नसल्याने डॉक्टर गटाने देखील या निवडणुकीत भाग घेतला नाही. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांना गृहीत धरणे, माझ्या शिवाय कोण उमेदवार आहे? कमकुवत पर्याय अभावी मलाच निवडून द्यावं लागेल. ही रणजित पाटील यांची भूमिका भाजपाच्या अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी यांना खटकणारी होती.
याविषयी भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीतमध्ये कार्यकर्त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळाले. याचा परिणाम भाजपा अनेक कार्यकर्त्यांची विरोधात मतदान न करता इशारा म्हणून मतदान बाद करण्याचा मार्ग निवडला का? अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
जुनी पेन्शन योजनेबाबत भाजपा तसेच देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेतील भूमिका देखील शिक्षकांना दुखावणारी होती. त्याचाच परिणाम रणजित पाटील यांना भोगावा लागला. सर्वाधिक म्हणजे प्रतिस्पर्धी उमेदवार हा अतिशय कमकुवत लेखणे हे महागात पडले.
हीच भूमिका भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना देखील लागू होते. राज्यात काँग्रेस लयाला गेली आहे. हा भ्रमाचा भोपळा या निवडणुकीने फोडला आहे. विदर्भात भाजपाबरोबर काँग्रेसचं संघटन देखील अतिशय मजबूत आहे. याकडे केलेलं दुर्लक्ष भाजपला महागात पडलं.
प्रफुल्ल साळुंखे
विशेष प्रतिनिधी