गडचिरोलीत धक्कादायक घटना: कुटुंबातील पाच जणांचा रहस्यमयी मृत्यू, गूढ उकलेना
Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चार आणि मावशी असा पाच जणांचा लागोपाठ गूढ मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अहेरी तालुका हादरला आहे. तालुक्यातील महागाव येथे 24 तासांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर 8 ऑक्टोबरला विवाहित मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर 14 ऑक्टोबरला मध्यरात्री मावशीचा तर 15 ऑक्टोबरला सकाळी मुलाचा मृत्यू झाला. वीस दिवसांत पाच जणांच्या गूढ मृत्यूने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
अहेरी तालुक्यातील महागाव येथे 22 सप्टेंबरला रात्री जेवण केल्यानंतर विजया शंकर कुंभारे (वय 45) यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना डोकेदुखी आणि थकवा जाणवू लागला. पती शंकर तिरुजी कुंभारे (वय 52) यांनी त्यांना चंद्रपूरला नेले. तेथे गेल्यावर त्यांनाही अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तेही उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती झाले. प्रकृती अधिक बिघडल्याने दोघांना नागपूरला हलविले. पण उपचारादरम्यान 26 सप्टेंबर रोजी शंकर तर 27 सप्टेंबरला विजया यांची प्राणज्योत मालवली.
Letsupp Special : बोरवणकरांच्या आरोपांमुळे अजितदादा अडचणीत; पण ‘तो’ बिल्डर नेमका होता तरी कोण?
आई-वडिलांची प्रकृती बिघडली तेव्हा विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (वय 29, रा. गडअहेरी. ता अहेरी) माहेरी होती. तिचीही प्रकृती खालवली. तीन दिवस चंद्रपूर येथे उपचार केले. त्यानंतर तिची सुटी झाली. मात्र पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने अहेरी येथे ग्रामीम रुग्णालयात भरती केले. पण प्रकृती अधिक खालवल्याने चंद्रपूरला नेताना 8 ऑक्टोबरला तिचा मृत्यू झाला.
शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे (वय 28) हा सिरोंचा येथे पोस्ट मास्तर पदावर कार्यरत आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर गावी आल्यावर त्याचीही प्रकृती खालावली होती. चंद्रेपूर येथे उपचारानंतर त्यास नागपूरला खासगी दवाखान्यात हलविले होते. 15 ऑक्टोबरला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, त्याची मावशी आनंदा उराडे (वय 50, रा. बेझगाव ता. मूल जि. चंद्रपूर) या अंत्यविधीसाठी महागावला आल्या होत्या. ती देखील आजारी पडली. चंद्रपूर येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान 14 ऑक्टोबरला मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यू सत्रामुळे परिसरात दहशतीचे वातवारण असून हे गूढ उकळण्याचे पोलीस आणि आयोग्य विभागासमोर आव्हान आहे.