राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट
Weather update: गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस (Monsoon rain) पडत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर मोसमी पावसाची वाटचाल मंदावली होती. आता तो पुन्हा सक्रिय झाला असून उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने (IMD) व्यक्त केला आहे.
विधानसभेसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय ठरला? शिंदे गटाच्या नेत्याने सांगूनच टाकलं
हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील ४ दिवस दक्षिण कोकणासह राज्यील अन्य भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज जारी करण्यात आलाय. तसंच सातारा, कोल्हापूर आणि पुण्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातही पाऊस जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पेरणीच्या कामाला गती मिळणार आहे.
उत्तर कोंकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/hQ9hLJZtZj— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 23, 2024
पुणे जिल्ह्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार
नैऋत्य मोसमी वारे पुण्यात दाखल झाल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे दिसून आले. सोमवारपासून (ता. 24) शहर व जिल्ह्यात मान्सून सक्रिय होणार असून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. किमान पुढील आठवड्यापर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडण्याचे संकेत आहेत.
पावसाने शेतकरी सुखावला
दरम्यान, आज छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार पाऊस झाला. तसंच ग्रामीण भागातही पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी परिसरात मुसळधार पाऊस झाला. आकुर्डी परिसरात रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. काही घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दुपारपासूनच शहरातील विविध भागात पाऊस पडत होता.