नगर जिल्ह्यात हे काय चाललंय? मोसंबीनंतर आता उसाच्या शेतातही पिकवला गांजा
अहमदनगर : गांज्याची शेती करणं हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतामध्ये गांजाची लागवड (Cultivation of Cannabis) केल्याचा प्रकार समोर आला आहे. नुकतेच शेवगाव तालुक्यात एका शेतकऱ्याने मोसंबीच्या शेतात गांजाची लागवड केली होती. ही घटना ताजी असताना आता पारनेर तालुक्यातही असाच एक प्रकार समोर आला आहे. पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील एका शेतकर्याने ऊसाच्या शेतात चक्क गांजाची लागवड केल्याचे समोर आले आहे. संबंधित ठिकाणी पारनेर पोलिसांच्या (Parner Police) पथकाने छापा टाकून सुमारे 12 लाख रूपये किंमतीचा 250 किलो गांजा हस्तगत केला आहे. (Cannabis grown in sugar cane fields Police seized 250 kg of ganja in a raid)
दरम्यान पोलिसांनी या शेतात छापा टाकून सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून संबंधित शेतकऱ्यांवर गुन्हा देखील दाखल केला आहे. नितील उर्फ गोट्या रामदास गोपाळे व बाळू रामदास गोपाळे (रा. कारखिले मळा, गुणोरे, ता. पारनेर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून यातील बाळु गोपाळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजप नेत्याचा मृत्यू; फडणवीसांचा नितीशकुमार सरकारवर हल्लाबोल
याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील गुणोरे येथील एका मळ्यात गोपाळे यांच्या ऊसाच्या शेतात गांजाची शेती करण्यात आली आहे, अशी गुप्त माहिती पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. यानंतर गायकवाड यांनी तात्काळ पोलिसांचे एक पथक तयार करून गोपाळे यांच्या मळ्यात छापा टाकण्याचे आदेश दिले.
पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी संबंधित ऊसाच्या शेताची पाहणी केली असता त्यांना सरीमध्ये गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी गांजाची संपूर्ण झाडे तोडून ती जप्त केली. याप्रकरणी बाळू रामदास गोपाळे यास ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गोपाळे यांची सुमारे वीस एकर शेती आहे. त्या शेतीमधील उसाच्या शेतात गांजाची शेती करण्यात येत होती. या शेतीच्या आजूबाजूने इतर कोणीही जात नसल्याने गोपाळे यांचा हा उद्योग सहीसलामत सुरू होता. मात्र पोलिसांनी मिळालेल्या माहितेच्या आधारे थेट कारवाई केल्यानं गांजाचा शेतीचा प्रकार उघडकीस आला.