VIDEO : लाडकी बहीण योजनेचा परिणाम होणार पण..; पवारांनी सांगितला राज्याचा ‘मूड’
Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेत महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. सध्या आचारसंहितेमुळे तूर्तास या योजनेची अंमलबजावणी थांबली आहे. सत्ताधारी पक्षांकडून प्रचारात या योजनेचा उल्लेख केला जात आहे. त्यामुळे विरोधी महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याच अस्वस्थतेवर बोट ठेवलं आहे. लाडकी बहीण योजनेचा काही ना काहीतरी परिणाम नक्कीच होईल असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.
शरद पवार यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. शरद पवार म्हणाले, आताची जी निवडणूक आहे या निवडणुकीत वेगळी स्थिती आहे. आज सत्ता ज्यांच्या हातात आहे त्या सत्ताधारी पक्षाला लोकसभा निवडणुकीत जो फटका बसलाय त्याची त्यांनी अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे. गंभीर दखल घेतली म्हणजे त्यांनी काय केलं तर लोकांना अधिक खूश करता येईल अशा योजना सुरू केल्या. त्याची उपयुक्तता किती आहे, किती दिवस टिकेल याची माहिती असली तरी आज वेळ मारून न्यायची आणि निवडणुका जिंकायच्या हे त्यांचं सूत्र आज मला दिसतंय.
लाडकी बहीण योजनेत जवळपास दोन कोटी महिलांना त्यांनी दीड हजार रुपयांप्रमाणे पैसे दिले आहेत. आता इतके पैसे वाटले म्हटल्यानंतर त्याचा परिणाम काही ना काहतरी नक्कीच होईल पण फार परिणाम होईल असं काही मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की एका बाजूला तुम्ही महिलांना मदत केलीत पण दुसऱ्या बाजूला राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
रोहीत पाटील तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद; आर आर आबांच्या मुलासाठी शरद पवार मैदानात
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही 30 च्या पुढे गेलो. याचा अर्थ केंद्र सरकारची भूमिका राज्यातील लोकांना पसंत नव्हती हे स्पष्ट दिसत होतं. दुसरा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. पीक हातातून चाललं आहे. सोयाबीन आणि कापसाच्या किंमती जास्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. शिक्षण संस्था वाढल्या. त्यात युवक शिक्षण घेत आहेत. पण नोकरी नाही रोजगार नाही अशी परिस्थिती आहे. आज तरुणांसमोर अनेक प्रश्न आहेत. त्यांचे प्रश्न मांडणं आमचं काम आहे, असे शरद पवार म्हणाले.