‘BRS चा रेट ठरलेला, त्यांचं सगळं काही पैशांवरच चालतं’; पटोलेंनी सुरुवातीलाच घेतला पंगा!
Nana Patole criticized BRS : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीने (BRS) महाराष्ट्रात पक्ष विस्ताराचा धडाका लावला आहे. राव यांच्या सभा झाल्या आहेत. तर पक्षात इनकमिंग जोरात सुरू झाले आहेत. आतापर्यंत प्रतिक्रिया न देणारे राजकीय नेतही आता बोलू लागले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बीआरएसवर जहरी टीका केली आहे. भारत राष्ट्र समितीचे रेट ठरलेले आहेत. त्यांचे पैशांचा भरवशावर काम सुरू आहे. बीआरएसच्या महाराष्ट्रात येण्यामुळे काहीच फरक पडणार नाही, अशा शब्दांत पटोले यांनी बीआरएसवर टीकास्त्र सोडले आहे.
पटोले दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बीआरएसवर त्यांनी सडकून टीका केली. बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव लवकरच सोलापुरात येणार आहेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरलाही जाणार आहेत. या घडामोडींआधी काँग्रेसचे वक्तव्य आल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
पटोले पुढे म्हणाले, मी कल्याण डोंबिवलीमध्ये गेलो होतो. जो भाजप आणि शिंदे गटाचा गड समजला जातो. पण तिथेही लोकांनी रस्त्यावर उतरून काँग्रेसचे स्वागत केले. काँग्रेस सत्तेत आले पाहिजे असे लोक म्हणत होते. कारण, या देशात लोकशाहीचे मूळ हे काँग्रेसचं आहे.
https://letsupp.com/maharashtra/western-maharashtra/sushilkumar-shinde-criticize-to-k-chandrashekhar-rao-on-pandharpur-tour-60453.html
बीआरएसवर टीका करताना ते म्हणाले, महाराष्ट्रात किती पक्ष आले आणि किती गेले हे आपण पाहिलं आहे. 99 मध्ये उत्तर प्रदेशातील एक पक्ष येथे आला होता. हैदराबादचाही पक्ष आला होता. आता आणखी दुसरा येतोय पण त्याने काहीच फरक पडणार नाही. चार लोकांना मदत करायची, त्याचा व्हिडीओ बनवायचा आणि खोटा प्रचार करायचा. हा जो गुजरात पॅटर्न आहे तोच तेलंगाणा पॅटर्न झाला आहे. बीआरएस पक्षाचं सगळं काम पैशांच्या भरवशावर सुरू आहे. कारण, सगळ्यांना माहिती आहे त्यांचा रेट ठरलेला आहे. पण यावर कोणी काहीच बोलत नाही. पण काहीजण मात्र दबक्या आवाजात चर्चा करत असतात. रेट किती आहेत यावर मी बोलणार नाही, अशी टीका पटोले यांनी केली.