पवारांनंतर आता आमदार काळेंही उद्योगमंत्र्यांच्या भेटीला, एमआयडीसीची केली मागणी…
Ahmednagar News : कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी व्हावी, या मागणीवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधी गटातील दोन आमदार भिडले आहे. आमदार रोहित पवार(Rohit Pawar) व आमदार राम शिंदे(Ram Shinde) यांचे शाब्दिक युद्ध सुरु असताना राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. आमदार आशुतोष काळे(Aashutosh Kale) यांनी देखील आपल्या मतदार संघात एमआयडीसी व्हावी, यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत(Uday Samant) यांची भेट घेतली आहे. तसेच एमआयडीसीसाठी मंजुरी मिळावी याबाबतचे निवेदन काळे यांनी मंत्री सामंत यांना दिले आहे.
निवेदनात नेमकं काय म्हंटले?
कोपरगाव मतदारसंघातील जिरायती भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत औद्योगिक केंद्र (एमआयडीसी) व्हावी, यासाठी आज उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. कोपरगाव मतदारसंघात औद्योगिक केंद्र उभारण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे.
तसेच रेल्वे स्टेशन, विमानतळ, समृद्धी महामार्ग, सिन्नर-शिर्डी महामार्ग व प्रस्तावित सुरत-चेन्नई महामार्ग कोपरगाव मतदारसंघातून जात असल्यामुळे औद्योगिक केंद्राला पोषक असे वातावरण कोपरगाव मतदारसंघात आहे. त्यामुळे कोपरगाव मतदार संघातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व या भागाचा विकास करण्यासाठी कोपरगाव मतदारसंघातील जिरायती भागात एमआयडीसी, व्हावे अशी मागणी सदर निवेदनाद्वारे उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ…
गेल्या काही दिवसांपासून कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी व्हावी, यासाठी आमदार रोहित पवार हे प्रयत्नशील आहे. त्यांनी यासाठी विधानभवानाबाहेर आंदोलन देखील केले. त्यांनतर भाजप आमदार राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामधील वाद चांगलाच पेटला.
या प्रश्नासाठी आमदार राम शिंदे यांनी यापूर्वीच पत्र व्यवहार केला असल्याचे म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनातील हवाच काढून घेतली होती. दरम्यान, असे असले तरी एमआयडीसीच्या मुद्द्यावरून दोन्ही आमदार तसेच कार्यकर्ते चांगलेच भिडले आहे. नुकतेच राष्ट्रवादीच्यावतीने आज कर्जतसह अनेक ठिकाणी रास्तारोको देखील करण्यात आला आहे.
दरम्यान, आगामी निवडणुका पाहता लोकप्रतिनिधी आपापल्या मतदार संघातील विकास कामांसाठी अधिवेशनात आवाज उठवताना दिसून येत आहे. मात्र सध्या स्थितीला विकास कामांवरूनच राज्यातील लोकप्रतिनिधी एकमेकांशी भिडत आहे. यासगळ्यात विकासाचे मुद्दे पुन्हा एकदा प्रलंबितच राहतात की काय अशी भीती आता नागरिक व्यक्त करू लागले आहे.