शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Anil Babar Passed Away : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे आज आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर त्यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार बाबर एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले होते. महाविकास आघाडीवर त्यांनी जोरदार टीका करत शिंदे गटाला साथ दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.

Eknath Shinde : ‘फक्त बोलघेवडेपणा करून धूळफेक करता येत नाही’ CM शिंदेंचा ठाकरेंना टोला

शिंदे आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते तेव्हापासूनच आमदार बाबर त्यांच्या सोबत होते. आमदारांच्या अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाने जी नावं दिली होती त्यात बाबर यांचेही नाव होते. सन 2019 मध्ये शिवसेनच्या चिन्हावर निवडून आले होते. सदाशिव पाटील या अपक्ष उमेदवाराचा पराभव त्यांनी केला होता. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षापासूनच राजकारणाला सुरुवात केली होती. सर्वात आधी खानापूर तालुक्यातील गर्दी गावचे सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1990, 1999, 2014 आणि 2019 या चार विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

टेंभू योजना पूर्णत्वास नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. याआधी मागील वर्षात त्यांच्या पत्नी शोभा बाबर यांचे निधन झाले होते. त्यानंतर सहाच महिन्यात अनिल बाबर यांचेही निधन झाले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय जीवनातील प्रवास राहिला. त्यांच्या आकस्मिक निधनाने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे.

बाजू कमकुवत झाली म्हणून खोट्या अफवा पसरवल्या, केसरकरांकडून अनिल परबांना प्रत्त्युत्तर

7 जानेवारी 1950 रोजी अनिल बाबर यांचा जन्म झाला. 1972 साली त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. सर्वात आधी 1990 मध्ये त्यांना आमदारकीची संधी मिळाली होती. 1982 ते 1990 या आठ वर्षांच्या काळात खानापूर पंचायत समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.

पश्चिम महाराष्ट्रात पाणीदार आमदार अशी त्यांची ओळख आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघ दुष्काळी म्हणून गणला जातो. या भागात जायकवाडी धरणातील पाणी आणता येईल यासाठी बाबर यांनी नेहमीच प्रयत्न केले. यासाठी त्यांनी टेंभू योजना पूर्णत्वास नेण्यासाठी मोठा पाठपुरावा केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज