Radhakrishna Vikhe Patil: दूध संकलन केंद्रावरील शेतकऱ्यांची लूट थांबवा
अहमदनगर : मिल्कोमिटर यंत्रांच्या (Milcomometer device) प्रमाणिकरणाची राज्यात कोणतीही शासकीय यंत्रणा नाही. दूध संकलन (Milk collection) केंद्रावरील वजन काट्यांची नियमित तपासणी होत नाही.
मिल्कोमिटर व वजन काटे नियमित तपासून त्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने (Milk Producer Farmers Sangharsh Committee) केली आहे.
फॅट आणि एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिल्कोमिटर यंत्रामध्ये तसेच दूध प्रमाण मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वजन काटे यंत्रामध्ये फेरफार करून शेतकऱ्यांची राज्यभर लूटमार सुरू आहे. याबाबत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने याबाबत दुग्ध विकास विभागाला वारंवार निवेदने दिली आहेत.
दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी या प्रश्नात लक्ष घालावे व राज्यात तातडीने दुग्ध विकास विभागाची स्वतंत्र मिल्कोमिटर व वजन काटे प्रमाणीकरण यंत्रणा उभारून दूध उत्पादकांची लुट थांबवावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात येत आहे.
दुग्ध विकास मंत्री व दुध आयुक्त यांनाही निवेदने देऊन या प्रश्नाबाबत हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. मात्र राज्याचा दुग्ध विकास विभाग संपूर्णपणे निष्क्रीय असल्याने याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही.
दुधाचे दर, फॅट व एस.एन.एफ.नुसार ठरत असतात. फॅट व एस.एन.एफ. मध्ये थोडा जरी बदल झाला तरी दूध उत्पादकाला मोठा तोटा होतो.
वजन मापनातील फरकामुळेही शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. सुस्त दुग्ध विकास विभाग या लुटमारी विरोधात काहीच करणार नसेल तर शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलनाच्या मार्गाने जावे लागेल, असा इशारा दिला आहे.