Ahmednagar Voilence : हिंसाचाराच्या निषेधार्थ शेवगावमध्ये व्यापाऱ्यांनी पुकारला बेमुदत बंद
Traders called a shutdown in Shevgaon to protest the violence : अहमदनगरच्या शेवगावमध्ये (Shevgaon)रविवारी रात्री दोन गटात झालेल्या हिंसाचाराच्या (violence ) घटनेनंतर अजूनही शहरात तणावाचे वातावरण आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) 31 आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, हिंसाचाराच्या या घटनेनंतर शहरातील शांतता भंग पावल्याने व्यापारी आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहे. आज 10 वाजता शेवगाव येथे व्यापारी, ग्रामस्थ व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची निषेध सभा आयोजित करण्यात आली असून या घटनेतील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करेपर्यंत शहर बेमुदत बंद (Closed indefinitely) ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राम नवमीला छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल उसळली होती. त्यानंतर अकोल्यातही दंगल झाली. अकोल्यात उसळलेली दंगल थांबत नाही तोच रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराजयांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दोन गट एकमेकांना भिडले होते. दरम्यान, दोन्ही गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. मोठ्या प्रमाणात जमलेल्या जमावाने काही गाड्यांची तोडफोड करून जाळपोळही केली. काही दुकानांवरही हल्ला चढवत तोडफोड केली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या हिंसाचारात पाच पोलीसांसह अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, हिंसाचाराच्या या घटनेमुळं शेवगावमधील व्यापारी आक्रमक झाला असून त्यांनी बेमुदत बंदचं हत्यार उपसलं आहे. शहरातील सीसीटीव्ही तपासून मुख्य आरोपींचा शोध घ्यावा आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी बंदचा इशारा दिला आहे. शहरात तणावपूर्ण शांतता कायम असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तैनात आहेत.
या घटनेत दगडफेक करणाऱ्या 250 ते 300 जणांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 31 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, समाजकंटकांच्या दहशतीला न घाबरता व्यापाऱ्यांनी दुकाने उघडावीत.शेवगावच्या इतिहासात कधीही घडलेली नाही, अशी दंगल घडवणाऱ्यांवर तसेच गुंडांवर कडक कारवाई केली जाईल. यामागचा सूत्रधार कोण आहे ते शोधून काढू, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.