धनगर आरक्षणाची मागणी करणाऱ्या उपोषणकर्त्यांचा ‘जलत्याग’; आरक्षणाबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप
अहमदनगर : जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने (Yashwant Sena) धनगर समाजाचे आरक्षणाच्या (Dhangar reservation) मागणीसाठी उपोषण सुरु आहे. धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावं या प्रमुख मागणीसाठी सुरु असलेल्या या उपोषणाचा आजचा पंधरवा दिवस आहे. मात्र मागणी मान्य होत नसल्याने आता उपोषणकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. चौंडीमधील (Chaundi) उपोषणकर्त्यांनी उपोषणाची तीव्रता वाढवत आजपासून थेट ‘जलत्याग’ केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यात मोठे आंदोलन झाले. त्यावेळी सरकारने नमतं घेत कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला. यानंतर आता धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला. माजी मंत्री बाळासाहेब दोडातळे यांच्या नेतृत्वाखाली चोंडी येथे उपोषण सुरू आहे.
सरकारला दिलेली मुदत संपली
दरम्यान, धनगर आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या काही उपोषणकर्त्यांची प्रकृती देखील खालावली आहे. या दरम्यान उपोषणकर्त्यांची मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी दोन दिवसात याबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र ही मुदत देखील संपली असून आता उपोषणकर्त्यांनी आक्रमकपणा स्वीकारला आहे. सरकारकडून कोणताही निरोप कोणी घेऊन आलेले नाही. आपला आवाज शासनापर्यंत पोहचावा यासाठी चौंडीमधील उपोषणकर्त्यांनी आता जलत्याग केला आहे. यामुळे आता धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
RBI Report : भारतीयांची उधळपट्टी वाढली, कर्ज काढून मौजमज्जा; आरबीआयचा धक्कादायक खुलासा
आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता नाही
आरक्षणाच्या मागणीसाठी आमचा लढा सुरु आहे. मात्र सरकारला दिलेला दोन दिवसांचा कालावधी देखील संपला आहे. या दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेले आश्वासन काही पाळले नाही. तसेच सरकारकडून कोणताही निरोप आमच्यापर्यंत आलेला नाही. हे सरकार धनगर आरक्षणाबाबत उदासीन आहे. आरक्षण देण्याची सरकारची मानसिकताच नाही असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
गेली ९ वर्षापासून आम्ही हा प्रश्न भाजपकडे मांडतोय. २०१४ ला आरक्षण देऊ सांगितलं. मात्र, अद्याप आरक्षण मिळालं नाही. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी प्राण गेला तरी चालेल. पण, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आता आम्ही माघार घेणार नाही असा इशारा देखील उपोषणकर्त्यांनी दिला आहे.