सिग्नलवर ‘या’ संदेशाचा फलक घेऊन उभा राहा; मद्यधुंत चालकाला उच्च न्यायालयाची आगळी-वेगळी शिक्षा
Drunk Driving : मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याचा आरोप असलेल्या ३२ वर्षांच्या तरूणाला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. परंतु, जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्याला सामुदायिक (Drunk Driving) सेवा म्हणून वरळी नाका जंक्शन सिग्नलवर गर्दीच्या वेळी उभे राहून दारू पिऊन वाहन चालवू नका असे लिहिलेले फलक घेऊन तीन महिने प्रत्येक आठवड्यांच्या शेवटी उभे राहण्याची आगळी शिक्षा सुनावली. आरोपी हा एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे.
सब्यसाची देवप्रिया निशांक असे या तरूणाचे नाव आहे. त्याने पुन्हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवू नये यासाठी न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने त्याला उपरोक्त आगळी शिक्षा सुनावली, निशांक याने लखनऊस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे व तो एका सुसंस्कृत कुटुंबातील आहे. असे असतानाही तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता आणि त्याने पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन केलं.
ठाकरे अन् शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा जोरात; मात्र,या नाराजांच्या अनुपस्थितीचं गौडबंगाल काय?
त्याचबरोबर, त्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचेही सकृतदर्शनी पुराव्यावरून स्पष्ट होत आहे. असे असले तरी दोन महिन्यांपासून तो कोठडीत आहे. त्याचे वय आणि भविष्यात नोकरीच्या दृष्टीने येणाऱ्य़ा संधीचा विचार करता त्याने आणखी तुरुंगवासात राहाण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करताना स्पष्ट केले. त्याला आगळ्या पद्धतीने सामुदायिक सेवा करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार, मद्यपान करून वाहन चालवण्याचे दुष्परिणाम याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी निशांक याने वरळी नाका जंक्शन येथे सिग्नलवर वाहतूक पोलीस अधिकाऱ्यासह हातात फलक घेऊन उभे राहण्याचे आदेश दिले. निशांक याने चार फूट बाय तीन फूट लांबीचा ठळक आणि मोठ्या अक्षरात दारू पिऊन वाहन चालवू नका असं लिहिलेले फलक हातात धरून जनजागृती करावी.
ही शिक्षा पुढील तीन महिन्यांसाठी असून आठवड्याच्या दर शनिवार आणि रविवारी रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथावर तीन तास उभे राहावे, असेही न्यायालयाने जामीन मंजूर करताना आदेशात नमूद केले. दरम्यान, एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या निशांक याने नोव्हेंबर २०२४ मध्ये दारू पिऊन गाडी चालवताना दोन पोलीस चौक्यांवर गाडी धडकवली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.