2005 पूर्वीच्या महात्मा गांधी सिरीजच्या नोटा 30 जूनपर्यंत खरचं बदलून घ्याव्या लागणार?

२००५ पूर्वी जारी केलेल्या महात्मा गांधी सिरीजच्या नोटा बंद होणार? वृत्तांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या एका कथित अंतर्गत परिपत्रकाचा हवाला

  • Written By: Published:
BOM

2005 पूर्वी छापलेल्या महात्मा गांधी सिरीजच्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा 30 जूननंतर बँका स्वीकारणार नाहीत, असा दावा करणाऱ्या एका व्हायरल संदेशामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. काही माध्यमांमध्येही या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा एकदा ‘नोटबंदी’ होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, बँक ऑफ महाराष्ट्रने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत तो दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे.

व्हायरल संदेशात नेमका दावा काय होता?

काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या एका कथित अंतर्गत परिपत्रकाचा हवाला देण्यात आला होता. त्यानुसार, 30 जूननंतर 2005 पूर्वीच्या गांधी सिरीजच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत आणि पुढे इतर बँकाही असा निर्णय घेऊ शकतात, असा दावा करण्यात आला होता. यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती.

बँकेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, 2005 पूर्वी छापलेल्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा 30 जूननंतर स्वीकारल्या जाणार नाहीत, असा संदेश चुकीचा असून त्यात कोणतेही तथ्य नाही. ग्राहकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माहितीलाच प्रमाण मानावे, असे आवाहनही बँकेने केले आहे.

रिझर्व्ह बँकेची भूमिका काय?

या प्रकरणात भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अशा प्रकारचा कोणताही नवीन आदेश जारी केलेला नाही. उलट, 2016 मध्ये आरबीआयने स्पष्ट केले होते की, 2005 पूर्वीच्या गांधी सिरीजच्या नोटा वैध आहेत आणि चलनात राहतील. त्या नोटा कमी प्रमाणात चलनात असल्याने इच्छुकांना त्या बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, त्या नोटा अवैध ठरविण्याचा किंवा चलनातून बाद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. आरबीआय वेळोवेळी अधिक सुरक्षित सुरक्षा वैशिष्ट्यांसह नवीन नोटा जारी करत असते. बनावट नोटांना आळा घालण्यासाठी नव्या नोटांमध्ये प्रगत सुरक्षा फीचर्स समाविष्ट केले जातात. मात्र, याचा अर्थ जुन्या नोटा आपोआप अवैध ठरतात, असा होत नाही.

नागरिकांनी काय लक्षात ठेवावे?

2005 पूर्वीच्या गांधी सिरीजच्या नोटा सध्या वैध असून, त्या 30 जूननंतर स्वीकारल्या जाणार नाहीत, हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.आरबीआय किंवा कोणत्याही बँकेने अशा नोटा बंद करण्याचा आदेश जारी केलेला नाही. कोणतीही आर्थिक माहिती किंवा चलनासंबंधी निर्णय समजून घेण्यासाठी फक्त आरबीआय आणि संबंधित बँकांच्या अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा.

follow us