“अनिल परब, ठाकरेंना विचारा राठोडांना का क्लीनचीट दिली?” चित्रा वाघ संतापल्या, सभागृहात काय घडलं?

Chitra Wagh Criticized Anil Parab : विधानपरिषदेत आज भाजप आमदार चित्रा वाघ आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अधिवेशनात आज दिशा सालियन मृत्यूचे प्रकरण भाजप आमदारांनी उचलून धरले होते. याच मुद्द्यावर मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी ठाकरे गटाच्या आमदारांनी मंत्री संजय ऱाठोड यांचे जुने प्रकरण उकरून काढले. यात आमदार चित्रा वाघ यांचेही नाव घेण्यात आले. तेव्हा संतापलेल्या चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अनिल परब तुमच्यात हिंमत आहे का, हिंमत असेल तर जा आणि उद्धव ठाकरेंना विचारा की संजय राठोड यांना का क्लीनचीट दिली? असा सवाल केला. यानंतर सभागृहात गोंधळ बराच वाढला होता.
नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ ?
मी अनिल परब यांना उत्तर द्यायलाच उभी आहे. बरं झालं तुम्ही आलात सभागृहात. मी काही घाबरत नाही . माझ्या सहकारी मनिषा कायंदे यांनी दिशा सालियनचा मुद्दा घेतला होता. यासंदर्भात प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले. या प्रकरणात एसआयटी स्थापन झालेली आहे. त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा. ही मी माझी भूमिका मांडली.
मंत्री संजय राठोड यांना ‘त्या’ प्रकरणात मोठा दिलासा; चित्रा वाघ यांनी दाखल केलेली याचिका निकाली
यावर संजय राठोड यांचा विषय घेण्यात आला. संजय राठोडांच्या वेळी चित्रा वाघ यांनी काय केलं होतं. मला जे करायचं होतं ते मी केलं. जे दिसलं जे पुरावे आले त्यावर मी लढले. तुम्ही (अनिल परब) तर तोंड शिवून बसला होतात. तुम्हीच घातलं होतं शेपूट. आता मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले? हिंमत आहे का, अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारण्याची. त्यांनी क्लीन चीट दिली त्यांना. अहो क्लीनचीट दिली त्यांना. अनिल परब फार हुशार आहेत. फार मोठे विधिज्ञ आहेत. हे मी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडूनच ऐकतेय. त्यांची हुशारी मी तर कधी पाहिली नाही.
उद्धव ठाकरेंना विचारा क्लीनचीट का दिली?
मला फक्त इतकंच म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहेत. ते का मंत्रिमंडळात आहेत? याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) दिलं. मिडियासमोर त्यांनी उत्तर दिलं तुम्ही ऐकलं नाही का? मग का नाही उत्तर दिलं? सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचं आणि महिलांवर दादागिरी करायची. हिंमत असेल ना जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा. का क्लीनचीट दिली? या लोकांना विचारा की त्यांनी संजय राठोडला क्लीनचीट कोणत्या मुद्द्यावर दिली? या प्रश्नाचं उत्तर ह्या लोकांनी दिलं पाहीजे. अनिल परब तुमच्यात हिंमत आहे का? असे सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केले. यावर ठाकरे गटाच्या आमदारांनी सभागृहात गदारोळ घालण्यास सुरुवात केली.
संजय राठोड कोण
संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आहेत. २००४ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर सलग पाच वेळा ते निवडून येत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली होती. मात्र, तरुणीच्या मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. २०२२ मध्ये शिंदेंच्या नेतृत्वात सरकार आल्यावर त्यांची अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालयात कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, तर २०२३ मध्ये त्यांनी मृद व जलसंधारण मंत्रालयात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं होतं.