राजन साळवींच्या पक्ष प्रवेशाने शिंदे गटात नाराजीचा सूर; पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत

मुंबई : शिवसेनाचे (ठाकरे गट) नेते आणि रत्नागिरी-लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी ठाकरे गटाच्या (UBT) उपनेते पदाचा राजीनामा देत बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे कोकणातील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असला तरी शिंदे सेनेत मात्र मोठी नाराजी पसरली आहे.
बीडमध्ये वाल्मिक कराडची ‘बी टीम’ सक्रिय, धनंजय देशमुखांनी थेट नावच घेतली…
शिंदेसेनेत नाराजीचा सूर
राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशानंतर विशेषतः राजापूर-लांजा मतदारसंघातील शिंदे सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले आहेत. या भागातील अनेक कार्यकर्त्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला असून त्यांनी साळवींच्या नेतृत्वाखाली काम करणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
नाराज कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत म्हटले आहे की, ‘राजन साळवी यांचे भूत आमच्या डोक्यावर नको. शिंदे साहेबांनी आमच्यावर हे मढं लादू नये. जर त्यांचा पक्षप्रवेश झाला असेल, तरीही त्यांच्या हस्तक्षेपाला आमच्या मतदारसंघात स्थान मिळणार नाही.
१५ वर्षांच्या कार्यप्रदर्शनावर प्रश्नचिन्ह
शिंदे गटातील नाराज कार्यकर्त्यांनी साळवींच्या मागील १५ वर्षांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘गेल्या १५ वर्षांत साळवींनी मतदारसंघात काय विकास केला? मतदारांनी ज्यांना नाकारले, अशांना आमच्या डोक्यावर बसवू नये, असे रोखठोक मत पदाधिकाऱ्यांनी मांडले आहे.
शिंदे गटाच्या अंतर्गत गटबाजीचा धोका?
राजन साळवी यांच्या प्रवेशाने कोकणातील शिंदे सेनेत अंतर्गत गटबाजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते साळवींना स्वीकारण्यास तयार नाहीत, त्यामुळे पक्षांतर्गत संघर्ष उफाळण्याची चिन्हे आहेत.
‘या’ चित्रपटात दिसणार प्राजक्ताचा वेगळा अंदाज, प्रेक्षकांसाठी विनोदाची मेजवानी
आगामी निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता
शिंदे गटाने मोठे नेते आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न केला असला तरी स्थानिक कार्यकर्त्यांची अस्वस्थता आगामी निवडणुकांसाठी अडथळा ठरू शकते. जर नाराज पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात राजीनामे दिले तर पक्षसंघटना कमकुवत होण्याची शक्यता आहे.
शिंदेसेना काय भूमिका घेणार?
एकनाथ शिंदे यांना आता या नाराजीला शांत करण्याचे मोठे आव्हान आहे. पक्षातील अंतर्गत असंतोष दूर करताना नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांनाही योग्य स्थान मिळेल याची काळजी घ्यावी लागणार आहे. कोकणातील राजकीय समीकरणे सध्या अस्थिर असून, यावर शिंदे गट काय तोडगा काढतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.