गायकवाडांचा गोळीबार ते वागळेंवरील हल्ला : शिंदे सरकारचे विसर्जन करा, मविआचे नेते राज्यपालांकडे

गायकवाडांचा गोळीबार ते वागळेंवरील हल्ला : शिंदे सरकारचे विसर्जन करा, मविआचे नेते राज्यपालांकडे

मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी केलेल्या गोळीबारापासून ते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्यावर झालेल्या हल्ल्यापर्यंत गेल्या एक महिन्यात महाराष्ट्रातील घडलेल्या घटना चिंताजनक आहेत. राज्यातले सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे त्यामुळे ते बरखास्त करावे अशी आमची मागणी आहे, असे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज (10 फेब्रुवारी) राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड असे विविध नेते उपस्थित होते. (Leaders of Mahavikas Aghadi met Governor Ramesh Bais demanding the dismissal of Shinde government)

राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या पत्रात काय म्हटले?

महोदय,

महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत, थोर समाजसुधारकांची भूमी आहे. महाराष्ट्राला मोठी परंपरा लाभलेली आहे, या राज्याने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतीक क्षेत्रातही महाराष्ट्राने मोठी प्रगती केलेली आहे. देशात आघाडीचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा नाव लौकिक आहे. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीतही महाराष्ट्र उत्तम राज्य म्हणून गणले जात होते परंतु अशा महान महाराष्ट्रातील सामाजिक विण विस्कळीत करण्याचे, राज्यातील शांतता भंग करण्याचे काम केले जात असून त्यातून कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या एक महिन्यात महाराष्ट्रातील घडलेल्या घटना चिंताजनक आहेत. शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून निर्घुण हत्या करण्यात आली. पुण्यात पत्रकार निखील वागळे यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत प्राणघातक हल्ला करण्यात आला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये दोन लोकांवर गोळीबार केला.

२२ जानेवारी रोजी मीरा रोड येथे धार्मिक तणाव, सरकारने बुलडोझर चालवून गरिबांची घरे तोडली. जळगावातील भाजपचे नगरसेवक मोरे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. यवतमाळ शहरात भर दिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आली. लहान लहान मुलांकडे शस्त्रे सापडत आहेत. अवैध शस्त्रांचा मोठा साठा राज्यात येत आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत हे अत्यंत गंभीर आहे. राज्यातले सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे, त्यामुळे ते बरखास्त करावे अशी आमची मागणी आहे.

माननीय राष्ट्रपती महोदय यांच्याकडे आपण आमच्या भावना कळवाव्या, ही विनंती.

धन्यवाद.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube