Maharashtra Politics : निलेश राणेंच्या निवृत्तीने चव्हाणांचा मार्ग मोकळा; लोकसभेचं गणित जुळणार?

Maharashtra Politics : निलेश राणेंच्या निवृत्तीने चव्हाणांचा मार्ग मोकळा; लोकसभेचं गणित जुळणार?

Maharashtra Politics : माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काल अचानक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडालेली असतानाच आगामी लोकसभा निवडणुकीचे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. निलेश राणे अशी तडकाफडकी निवृत्ती का घेतली याचे उत्तर अजून समोर आलेले नाही. तर दुसरीकडे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) सिंधुदुर्गातून भाजपाचे उमेदवार असतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत चव्हाण यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, यानंतर राजकारणात नवाच ट्विस्ट आला आहे.

“मनाला पटत नाही तिथे वेळ घालवण्यात अर्थ नाही” : नारायण राणेंच्या पुत्राची राजकारणातून निवृत्ती

राणे-चव्हाण फडणवीसांच्या भेटीला

आज सकाळीच रवींद्र चव्हाण यांनी थेट निलेश राणे यांची भेट घेतली. राणे यांच्या जुहू येथील बंगल्यात चव्हाण दाखल झाले. येथे दोघात जवळपास तीन तास चर्चा झाली. त्यानंतर दोन्हीही नेते एकाच गाडीतून बंगल्याबाहेर पडले. हे दोघे नेमके कुठे गेले, त्यांच्यात काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, निलेश राणे यांनी काल राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटले. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. कणकवलीच्या दिशेने कार्यकर्ते येऊ लागले. कुडाळ नगरपंचायतीमधील दोन नगरसेवकांनी राजीनामेही दिले.

भाजपकडून राणेंच्या मनधरणीचे प्रयत्न 

या घडामोडींनंतर भाजप अलर्ट झाला आहे. त्यामुळेच मंत्री चव्हाण आज सकाळीच राणे यांच्या घरी दाखल झाले. निलेश राणे यांची नेमकी नाराजी काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. चव्हाण यांच्याबाबतीतही राणे यांची नाराजी होती असेही आता सांगण्यात येत आहे. यानंतर त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

काय म्हणाले होते निलेश राणे?

नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या 19/20 वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.

जरांगे पाटलांकडून पुन्हा उपोषणाचा एल्गार! गिरीश महाजनांची अखरेच्या क्षणापर्यंतची शिष्टाई निष्फळ

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र! अशी घोषणा त्यांनी केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube