आणखी एका मराठा आंदोलकाने मृत्यूला कवटाळलं; आत्महत्येपूर्वी जरांगे पाटलांना लिहिली चिठ्ठी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय असलेल्या सुनील बाबुराव कावळे या युवकाने मुंबईत आत्महत्या केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, कावळे चिकनगाव (ता. आंबड) येथील ते रहिवासी आहेत. काल (18 ऑक्टोबर) सायंकाळी ते कामावर जातो, असं सांगत घरुन निघाले होते. मात्र आज (19 ऑक्टोबर) पहाटे वांद्रे स्थानकाजवळ गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद खेरवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. (Maratha reservation activist Sunil Baburao Kawle committed suicide in Mumbai)
यावेळी आत्महत्येपूर्वी सुनील कावळे यांनी लिहिलेली एक चिठ्ठीही आढळून आली आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून कावळे यांनी ही चिठ्ठी लिहिली आहे. ‘एकच मिशन मराठा आरक्षण’ असं म्हणत त्यांनी त्यांच्या व्यथा या चिठ्ठीत मांडल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाकरिता मराठा समाजातील लोकांनी 24 ऑक्टोबरला मुंबईमध्ये एकत्र येण्याचेही आवाहन केले आहे. चिठ्ठीच्या शेवटी त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे.
विनोद पाटील यांनी ट्विट करुन दिली माहिती :
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी कावळे यांच्या आत्महत्येबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली. माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका!
आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली.
माझ्या मराठा बांधवांनो,
आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई…
— Vinod Patil (@vnpatilofficial) October 19, 2023
सरकारला विनंती की, यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही. यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे. हुतात्मा सुनील बाबुराव कावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असेही त्यांनी म्हंटले.
मनोज जरांगेंच्या आवाहनानंतरही आत्महत्या :
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील माडज येथील किसन माने या तरुणाने मराठा आरक्षणासाठी तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी सर्व मराठा समाजाला शांतता आणि संयम राखण्याचं, कोणतही टोकाचं पाऊल न उचलण्याची विनंती केली होती. मात्र त्यानंतरही आता सुनील बाबुराव कावळे या युवकाने मुंबईत आत्महत्या केली आहे.