भुजबळांच्या दालनात कुणाचे फोटो? पत्रकाराचा प्रश्न अन् भुजबळांचं मन जिंकणारं उत्तर

भुजबळांच्या दालनात कुणाचे फोटो? पत्रकाराचा प्रश्न अन् भुजबळांचं मन जिंकणारं उत्तर

प्रशांत गोडसे, मुंबई

Chhagan Bhujbal : अन्न व नागरी पुरवठा खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी संवाद साधला. संवादादरम्यान पत्रकारांनी त्यांच्या दालनातील महापुरुषांचे फोटो दिसत नसल्याची विचारणा केली. त्यावर भुजबळांनी त्वरित अधिकाऱ्यांना आवाज देत, “फोटो कुठे आहेत?” असा थेट प्रश्न विचारला.

भुजबळ स्वतः खुर्चीवरुन उठले आणि अधिकाऱ्यांना म्हणाले फोटो कुठे आहेत? त्यानंतर अधिकाऱ्याने फोटोंचा संच आणून भुजबळांच्या समोरील टेबलावर ठेवला. भुजबळ पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो माझ्या दालनात असणारच.” “राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा फोटोही असणार आहे, कारण ते पक्षाचे नेतृत्व करत आहेत.”

राजकीय भान राखत त्यांनी कोणताही वाद न होता सर्व नेत्यांना योग्य तो मान देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या उत्तरातून त्यांनी राष्ट्रीय, ऐतिहासिक आणि पक्षीय नेतृत्वाचा समतोल साधल्याचे दिसले. दालनातील फोटोंवरून विचारलेल्या एका साध्या प्रश्नावर भुजबळांनी संयमित आणि स्पष्ट उत्तर दिलं.

पालक नसलो तरी, मी नाशिकचा बालक; मंत्रीपदाची माळ गळ्यात पडताच भुजबळांची फटकेबाजी

भुजबळांना अन्न व पुरवठा खात्याचा पदभार

छगन भुजबळ यांना सुरुवातीला मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं होतं. त्यांनी नाराजी बोलावूनही दाखवली होती. परंतु, मधल्या काळात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याचा पदभार अजितदादांनी स्वतःच्या हाती घेतला होता. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपदही घेतलं होतं. मंत्रिमंडळात आणि विशेषतः राष्ट्रवादीत अनुभवी मंत्र्याची कमतरता जाणवत होती.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे छगन भुजबळांची नाराजी फार काळ परवडणारी नाही असा विचार पक्षात सुरू होताच. यांसह अन्य गोष्टींचा विचार करुन अखेर छगन भुजबळांना पुन्हा सन्मानाने मंत्रिमंडळात घेण्यात आलं. त्यांना आता कोणतं खातं मिळणार असा प्रश्न विचारला जात होता. भुजबळांनी तर मला कोणतंही खातं दिलं  तरी चालेल असं आधीच सांगून टाकलं होतं. परंतु, अपेक्षेप्रमाणे त्यांना अन्न व नागरी पुरवठा खातं देण्यात आलं. याआधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात, त्यानंतर शिंदे सरकारच्या काळात भुजबळांकडं हे खातं होतं.आता तिसऱ्यांदा हेच खात भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे.

मंत्रीपदाची माळ गळ्यात पडताच मंत्री छगन भुजबळ साईचरणी; पाहा फोटो

follow us
  • fb
  • instagram
  • youtube