“दोन दिवसांपासून मी डोंबिवलीतच, कुठेच गेलो नाही”, CM पदाच्या चर्चांना चव्हाणांचा फुलस्टॉप!
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे अधोरेखित झालं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या घडामोडी घडत असतानाच एकनाथ शिंदे यांनी गुगली टाकत त्यांच्या गावी निघून गेले आहेत. यातच आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी अचानक पुढे आलं होतं. त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. त्यामुळे मोहोळ यांनी स्वतःच ट्विट करत या चर्चांना फुलस्टॉप दिला. यानंतर तरी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा थांबतील असे वाटले होते. पंरतु, या चर्चांमध्ये आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. मुरलीधर मोहोळ नाही तर आता भाजपाचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचं नाव पुढं आलं होतं.
चव्हाण यांनी मात्र या सर्व चर्चा नाकारल्या असून यात काहीच तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. याबाबत त्यांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे, की गेल्या २-३ दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघातच आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. या दोन दिवसात किंवा काल मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाही. त्यामुळे कृपया प्रसारमाध्यमांनी कोणत्याही प्रकरणाची शहानिशा करून बातम्या चालवाव्यात, ही नम्र विनंती ! असे चव्हाण यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
गेल्या २-३ दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघातच आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. या दोन दिवसात किंवा काल मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाहीये. त्यामुळे कृपया प्रसार माध्यमांनी…
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) December 1, 2024
डोंबिवलीकरांची साथ.. पुन्हा विजयाचा निर्धार; रवींद्र चव्हाणांना पक्का विश्वास
राज्याच्या निवडणुकांचे निकाल येऊन आठवडा उलटून गेला तरीही महायुतीला मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेता आलेला नाही. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्यानंतर भाजपाचाच मुख्यमंत्री होणार इतकं निश्चित आहे. या पदासाठी देवेंद्र फडणवीस सर्वात प्रबळ दावेदार असल्याचंही दिसत आहे. मात्र तरीही निर्णय घेता आलेला नाही.
एकनाथ शिंदे त्यांच्या गावी गेले असून आज ठाण्यात परततील असे सांगण्यात येत आहे. जर दुपारपर्यंत शिंदे ठाण्यात पोहोचले तर आज सायंकाळी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री आणि खातेवाटपाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र या सर्व शक्यता आहेत. याबाबत अद्याप ठोस माहिती काहीच मिळालेली नाही. दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीतही मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. मात्र, काही ठोस निर्णय झाला नव्हता.
या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी जर आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर गृह, नगरविकास, जलसंपदा अशा मोठ्या खात्यांची मागणी केली होती. मात्र गृह खाते कोणत्याही परिस्थितीत सोडायचं नाही अशी भाजपाची भूमिका आहे. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावी निघून गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा निर्णय काही झाला नव्हता.
तळोजा मेट्रो प्रकल्प डोंबिवलीकरांसाठी फायदेशीर ठरणार, मंत्री रवींद्र चव्हाणांना विश्वास
या घडामोडी घडत असतानाच काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव अचानक पुढे आलं होतं. मात्र त्यांनी स्वतः खुलासा करत या चर्चा निरर्थक असल्याचे लागलीच स्पष्ट केलं. त्यांच्या या खुलाशानंतर त्यांचं नाव मागे पडलं. पण, आणखी एक नवीन नाव चर्चेत आलं होतं. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आमदार रवींद्र चव्हाण यांचं नाव पुढं आलं होतं. राजकीय वर्तुळात तशा चर्चाही सुरू झाल्या होत्या.
डोंबिवलीला यंदा गृहमंत्रिपद मिळेल अशी चर्चा असतानाच हा नवा ट्विस्ट आला होता. अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत बिगर मराठा मुख्यमंत्री दिल्यास काय प्रतिक्रिया उमटेल याची चाचपणी करण्यात आली. त्यामुळे जर फडणवीस यांच्या नावाला विरोध झालाच तर रवींद्र चव्हाण यांना संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती. परंतु, रवींद्र चव्हाण यांनी या सर्व चर्चा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावल्या आहेत.