Mumbai News : शरद पवारांबाबत वादग्रस्त लिखाण; उच्चशिक्षित तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Mumbai News : राजकारणातील राजकीय संघर्ष आता सोशल मीडियावरही व्यक्त होताना दिसत आहे. यात कार्यकर्ते आणि बऱ्याचदा सोशल मीडिया युजरही सहभागी होतात. पातळी सोडून आक्षेपार्ह शब्दांचा वापर होतो. अशाच एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका उच्चशिक्षित तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. सोशल मीडियात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह केल्याप्रकरणी बेलापूर पोलिसांनी विशाल गोरडे नावाच्या युवकाला अटक केली. या प्रकरणी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
मी साठीनंतर निर्णय घेतलाय, तुम्ही तर चाळीशीच्या आत.. अजितदादांचा शरद पवारांना टोला
घाणेकर यांनी या संदर्भात पोस्ट लिहित पोलीस प्रशासनाला इशाराही दिला होता. आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर फेसबुकद्वारे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विशाल गोरडे याच्याविरुद्ध आज तक्रार दाखल केली. लवकरात लवकर याला अटक करून शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. नाहीतर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा घाणेकर यांनी दिला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर घाटकोपर येथे राहणाऱ्या आणि एमबीएचं शिक्षण घेत असलेल्या युवकाला ताब्यात घेतलं.
पोलिसांनी त्याला वाशी न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता गोरडे याने जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारानंतर अटकेत असलेल्या गोरडेचीही बाजू समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं गोरडे यानं म्हटलं आहे. कोरोना संकटाच्या काळात 2021 मध्ये नोकरी गेली. त्यानंतर कंपन्यांना कामगार पुरवण्याचं काम करत होतो. परंतु, या रोजगारातून फारसे पैसे मिळत नव्हते. त्यामुळे मला नैराश्य आले असा दावा विशाल गोरडे याने केला आहे.
Sharad Pawar’s birthday: शरद पवारांची सुरूवातच भावाचा पराभव करून झाली, तेथे पुतण्याचे काय?