Video: “मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा..”, विधानसभेत गदारोळ; पटोले एक दिवसासाठी निलंबित

Video: “मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा..”, विधानसभेत गदारोळ;  पटोले एक दिवसासाठी निलंबित

Maharashtra Monsoon Session Updates : पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस सत्ताधारी (Maharashtra Monsoon Session) आणि विरोधकांतील खडाजंगीनेच सुरू झाला. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यांचे पडसाद अधिवेशनात उमटले. विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. काँग्रेस आमदार नाना पटोले (Nana Patole) आणि अन्य विरोधी आमदारांनी घोषणाबाजी केली. नाना पटोले तर विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन राहुल नार्वेकर यांना जाब विचारू लागले.

यानंतर मु्ख्यमंत्र्यांनी पटोलेंनी माफी मागावी असे सांगितले. मात्र गदारोळ वाढत असल्याचे लक्षात येताच विधानसभा अध्यक्षांनी पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, यानंतर विरोधकांनी थेट सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मला नियम माहिती आहेत मी अध्यक्षांचा अपमान केलेला नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

“85 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांपेक्षा 25 हजार कोटींची कर्जमाफी द्या”

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेली वक्तव्ये वादग्रस्त ठरली होती. अधिवेशनात आज विरोधकांनी याच वक्तव्यांवर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. नाना पटोले यांनी या वक्तव्यांवर संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी पटोले यांनी केली. यावेळी सभागृहात जोरदार गोंधळ सुरू होता.

मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा नाही

बबनराव लोणीकर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. हा अपमान अन्नदाता कधीच सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात माफी मागितली पाहिजे. मोदी तुमचा (सत्ताधारी) बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही, अशी घणाघाती टीका नाना पटोले (Nana Patole) यांनी यावेळी केली.

पटोलेंच्या या वक्तव्यानंतर सभागृहात गोंधळ वाढला होता. पटोले यांनी जे शब्द वापरले त्याबद्दल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यांना समज दिली. याच दरम्यान पटोले अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन अधिक त्वेषाने बोलू लागले. यानंतर सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. नंतर पुन्हा कामकाज सुरू झाले. त्यावेळी विरोधी पक्षातील आमदारांनी माफी मागा, माफी मागा शेतकऱ्यांची माफी मागा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

पटोलेंनी माफी मागावी : फडणवीस

याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाना पटोले यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणे ही वेगळी गोष्ट  आहे. पण थेट अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे अशोभनीय आहे. जणूकाही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीने त्यांच्या अंगावर धावून जाणं हा प्रकार सभागृहात पहिल्यांदाच पाहत आहोत. नाना पटोले स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी असं वागणं योग्य नाही. त्यांनी माफी मागायला हवी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube