श्रीकांत शिंदेंच्या ‘धंद्यांना’ संरक्षण देण्याऱ्यांपैकी महेश गायकवाड एक व्यक्ती : दानवेंचा गंभीर आरोप

श्रीकांत शिंदेंच्या ‘धंद्यांना’ संरक्षण देण्याऱ्यांपैकी महेश गायकवाड एक व्यक्ती : दानवेंचा गंभीर आरोप

कल्याण : या भागातील धंदे सांभाळण्यासाठी किंवा त्या धंद्यांना संरक्षण देण्यासाठी शिवसेना (ShivSena) खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी जी काही खास माणसे आपल्या हाताशी बाळगली आहेत, त्यापैकी एक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना (UBT) नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी केला. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. (Shiv Sena (UBT) leader and Leader of Opposition in Legislative Council Ambadas Danve leveled serious allegations against MP Shrikant Shinde.)

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच केलेल्या गोळीबारानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एक सत्ताधारी पक्षाचा आमदार, ते देखील पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करतो आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करतो या घटनाक्रमाने भाजपचेही  नेते सुन्न झाले आहेत. सर्व विरोधक या घटनेनंतर एकवटले असून यामुळे शिंदे सरकारही काहीसे बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे.

राणे केवळ भाजपची लाचारी करतात, पण आता भुंकणाऱ्यांचे दिवस…; विनायक राऊतांची जहरी टीका

अशात अंबादास दानवे यांनी थेट श्रीकांत शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या एका माजी नगरसेवकांवर भर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडल्या. अशी घटना भाजप विरोधी पक्षात असताना घडली असती तर काय मागणी काय केली असती? भाजप साधनशुचितेच्या गोष्टी करते आणि त्यांचाच एक आमदार भर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडतो?

अर्थात महेश गायकवाड काही धुतलेल्या तांदळाचा आहे असे नाही. वेगवेगळ्या पद्धतीने भूखंड हडपणे आणि आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे या भागात धंदे सांभाळण्यासाठी किंवा धंद्यांना संरक्षण देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी जी काही खास माणसे आपल्या हाताशी बाळगली आहेत, त्यापैकी एक महेश गायकवाड आहेत, असाही आरोप अंबादास दानवे यांनी केला.

काकाच्या मरणाची वाट पाहतोय, लाज वाटते तुमच्यासोबत काम केल्याची; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

साधनशुचितेच्या गोष्टी करणारी, कायदा सुव्यवस्थेचे संरक्षण करणारी, या देशातील जनतेच्या जीविताचे संरक्षण करणारी भाजप आहे म्हणते, त्याच भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री असताना अशा पद्धतीने घटना महाराष्ट्रात होते. आज सगळीकडे जर बघितले तर बिहार झाला म्हणत महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे.आत्तापर्यंत भाजपने खरंतर या आमदाराला पक्षातून काढायला पाहिजे होते.

शिवाय भारतीय जनता पक्षाचाच आमदार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गद्दार म्हणतो. आम्ही गद्दार म्हटल्यावर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फार मिरच्या लागतात. जे 40 आमदारांना गद्दार म्हटल्यावर फार मिरच्या लागतात. पण ज्यांच्याबरोबर सत्तेत बसलेले आहेत त्याच पक्षाचा आमदार त्यांना गद्दार म्हणतो, मग आता काय? असा सवालही आमदार अंबादास दानवे यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube