“राज ठाकरेंमध्ये आम्ही बाळासाहेबांना पाहतो”, शिंदे गटाच्या नेत्याची ठाकरेंना पुन्हा साद..

“राज ठाकरेंमध्ये आम्ही बाळासाहेबांना पाहतो”, शिंदे गटाच्या नेत्याची ठाकरेंना पुन्हा साद..

Ramdas Kadam on Raj Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीत एकला चलो चा नारा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी याबाबत भाष्य केलं होतं. तसेच उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही सुनावलं होतं. यानंतर महायुती सरकारने मुंबईतील प्रवेशद्वार असणाऱ्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयावर राज ठाकरे यांनी खोचक टीका केली होती. “हा टोलमाफीचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण” अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती. त्यांच्या याच वक्तव्यावर शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले रामदास कदम ?

एखादी मागणी करणे आणि ती लावून धरणे यात खूप मोठा फरक आहे. राज ठाकरे नेहमीच स्पष्ट बोलतात. आम्ही त्यांच्यात बाळासाहेब ठाकरेंना पाहतो. मी त्यांना सल्ला देणार नाही. मी तसा प्रयत्न केला तर ते चुकीचं ठरेल. माझं त्यांना इतकंच सांगणं आहे की चांगल्या कामाला चांगलं म्हणणं शिकायला हवं. राज ठाकरे स्पष्टवक्ते आहेत. देशात त्यांची तशीच इमेज आहे. त्यांनी ही प्रतिमा तशीच ठेवाव. पण माझी त्यांना विनंती आहे की हा निर्णय उशिरा घेतलेला नाही. उलट त्यांनी या निर्णयाचं कौतुक करायला हवं.

Raj Thackeray : टोल आंदोलनाचं काय झालं? असं कुणी विचारलं तर, त्यांना मुंबईचं उदाहरण द्या!

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज्य सरकारचा हा निर्णय सुत्य असून, गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरु होता त्याला यश मिळालं आहे, उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली. मात्र, हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा नाहीतर निवडणुकीनंतर त्याचा बोजा जनतेवर माराल.

टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला… आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही. पण असो… किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी.

‘लाडकी बहीण’ योजनेचा गाजा-वाजा मोठा; सरकारचा व्यवहार मात्र खोटा, ‘त्या’ ९० हजार महिला वंचितच

आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही. खरंतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले. महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’ असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube