Lok Sabha Election 2024: शिंदेंचं ठरलं! ठाणे लोकसभेसाठी नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर
Thane Lok Sabha Election 2024 Naresh Mhaske : सध्याची मोठी बातमी म्हणजे ठाणे लोकसभेसाठी ( Lok Sabha Election 2024) महायुतीत ठाण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. नरेश गणपत म्हस्के (Naresh Mhaske) यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून नरेश म्हस्के यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. आता ठाणे लोकसभेसाठी नावाबाबतचा तिढा सुटला आहे. ठाणे लोकसभेच्या रिंगणात आता नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या नावाची वर्णी लागली.
गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत नरेश म्हस्के व्यक्त झाले होते. ठाण्यातून लोकसभेची जागा कुणाला मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. कारण CM एकनाथ शिंदे यांचा बाल्लेकिल्ला असलेल्या ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार की भाजपला मिळणार यावर बरीच चर्चा रंगली होती. अखेर आता ही जागा शिवसेना लढवणार हे निश्चित झाल्यावर त्यासाठी तीन ते चार प्रबळ दावेदार तयार झाले होते. तर भाजपकडून देखील दोन दिग्ग्ज नेत्यांनी इच्छुकता दाखवली होती. परंतु आता मुख्यमंत्र्याचा हुकुमी एक्का नरेश म्हस्के रिंगणात उतरल्याने सर्वच चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
दक्षिण मुंबईनंतर शिंदेंकडून नाशिकही काबीज, लोकसभेसाठी गोडेसेंचं नाव जवळपास निश्चित; आज घोषणा?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशिर्वादाने मला ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. खूप जणांचे योगदान यामध्ये आहे. एका कार्यकर्त्याला ही जागा लढवण्याची जबाबदारी दिली आहे आणि हे फक्त शिवसेनेतच होऊ शकते. सगळ्यांच्या सहकार्याने संधीचे सोने करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हिंदुत्वाची भूमिका पूर्णपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ठाणे लोकसभा लढवत असताना या ठिकाणी मला कोणतेही आव्हान वाटत नाही. कार्यकर्ते सहकार्याने आम्ही काम करु व जनतेपर्यंत पोहचू, असा प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.
ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे निवडणूक लढवण्यासाठी नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, विधानपरिषद माजी सदस्य रवींद्र फाटक तर ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचेही नाव पुढे आली आहे. यापैकी उमेदवारीचा टिळा कोणाच्या भाळी लागणार? असा सवाल नरेश म्हस्के यांना विचारण्यात आला होता.
यावर म्हणाले होते की, “आमच्यामध्ये इच्छूक नावाचा काही प्रकार नाही. पक्षाचे मुख्य नेते याविषयी जो काही तो निर्णय घेतील तो योग्यच घेतील. माझ्या दृष्टीने वैयक्तिक उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही काम करत नाही. महायुतीसाठी सर्व एकत्र येऊन काम करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा आणि ठाण्यातील जागा सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आणण्याचा जो शब्द दिला आहे तो पूर्ण करण्याचे आमचे एकमेव उद्दिष्ट असणार आहे.