“ज्याप्रकारे तुझ्या बापाची हत्या झाली तसाच तुलाही..”, झिशान सिद्दीकींना धमकीचा ई मेल; तपास सुरू..

“ज्याप्रकारे तुझ्या बापाची हत्या झाली तसाच तुलाही..”, झिशान सिद्दीकींना धमकीचा ई मेल; तपास सुरू..

Mumbai News : राज्यातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि राजकीय नेत्यांनी धमक्यांचं सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दीकी यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. आता त्यांचा मुलगा आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकाराची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर लागलीच पोलिसांचे पथक सिद्दीकींच्या घरी दाखल झाले. पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. याआधी झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची बिश्नोई टोळीने हत्या केली होती. यानंतर आता झिशान सिद्दीकींना धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.

झिशान सिद्दीकी यांच्या पर्सनल ईमेल आयडीवर धमकीचा मेल आला होता. ज्या प्रकारे तु्झ्या बापाची हत्या झाली त्याचप्रकारे तुझी हत्या होणार असा उल्लेख या ई मेलमध्ये आहे. इतकेच नाही तर झिशान सिद्दीकी यांना 10 कोटींची मागणीही करण्यात आली आहे. या मेलची माहिती सिद्दीकींनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांचे एक पथक सिद्दीकी यांच्या घरी दाखल झाले. मेल कुणी केला, याचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, या मेलमध्ये डी कंपनीचाही उल्लेख आहे. परंतु, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.

अनमोल बिश्नोई… व्हिडिओ कॉल अन् बाबा सिद्दीकींची हत्या, मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा

मुंबई पोलिसांकडून झिशान सिद्दिकी यांचा जबाब नोंदवला जात आहे. तर माध्यमांशी बोलताना झिशान यांनी सांगितलं की, गेल्या दोन दिवसांत मला अशा प्रकारचे तीन ईमेल आले आहेत. हे मेल पाठवणारे डी कंपनीचे संबंधित असल्याचे त्यांनी म्हटलं. त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच दहा कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर मी थेट पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलीस घरी आले आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी झिशान यांचे वडील आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची देखील हत्या करण्यात आली होती. 12 ऑक्टोबर 2024 च्या रात्री मुंबईतील वांद्रा येथील झिशान यांच्या ऑफिसमधून ते बाहेर पडत होते. त्यावेळी तीन जणांनी त्यांच्यावर हल्ला करत गोळीबार करून त्यांना जीवे मारलं होतं. त्यानंतर या हत्याकांडाशी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गॅंग यांचे नाव समोर आलं होतं. तेव्हापासूनच सिद्दिकी यांच्या परिवाराची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. परंतु आता त्यांनाही धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी, माजी मंत्री बाबा सिद्दीकींचा मारेकरी पंजाब पोलिसांच्या अटकेत

follow us
  • fb
  • instagram
  • youtube