Uddhav Thackeray : बीबीसीच्या कार्यालयावर धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीमध्ये बसतं?
मुंबई : बीबीसी कार्यालयावर (BBC offices) आयकर विभागाने (Income Tax Department) छापेमारीवरून शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदी सरकारवर (Modi Govt) जोरदार हल्लाबोल केला आहे. बीबीसीच्या कार्यालयावर धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीमध्ये बसतं? असे प्रकार वेळीच रोखले नाही तर देशात हुकुमशाही येण्यास वेळ लागणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बीबीसीवरील कारवाईचा निषेध व्यक्त करत मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.
मागील काही दिवसांपासून बीबीसीने प्रदर्शित केलेल्या इंडिया- द मोदी क्वेश्चन या माहितपटाची चांगलीच चर्चा होत आहे. या माहितीपटातून गोध्रा हत्यांकाडादरम्यान, गुरजातचे तत्कालीन सीएम नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे या माहितीपटावर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे. अशातच बीबीसी कार्यालयावर आज आयकर विभागाने धाड टाकली. त्यामुळे राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रायगड मधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी बीबीसीच्या कार्यालयावर पडलेल्या धाडीवर देखील भाष्य केले आहे.
Ahmednagar जिल्हाधिकारी Rajendra Bhosle ची मुंबईत बदली, सालीमठ नवे जिल्हाधिकारी
यावेळी ठाकरे म्हणाले, लोकशाहीच्या ४ स्तंभात माध्यम हा महत्त्वाचा स्तंभ आहे. बीबीसीच्या कार्यालयावर धाड टाकली. एखाद्यानं आपल्या विरोधात बातम्या लावल्या म्हणून त्या प्रसारमाध्यमावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते? सरकारविरोधात बोलाल तर तो आवाज चिरडून टाकला जाईल, अशीच केंद्र सरकारची भूमिका असल्याचंही ठाकरे म्हणाले.
ते म्हणाले, आम्ही वाटेल ते करू पण तुम्ही आवाज उचलायचा नाही. जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू. ही पाशवी वृत्ती आज आपल्या देशात फोफावायला बघतेय. ही आपण वेळेवर एकत्र आलो नाहीत आणि ताकद वाढवली नाही तर संपूर्ण देश खाऊन टाकेल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे.
दरम्यान, गुलामगिरी ती गुलामगिरीच असते मग ती स्वकीयांची असेल परकीयांची असेल. भारत माता पुन्हा माझी गुलाम कशी होईल, या दिशेने त्यांची जी पावलं चालली आहेत ती पावलं वेळेत ओळखून आपल्याला एकत्र यायला पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.