Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना अटक होणार? आप नेत्याच्या ट्विटने खळबळ!
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी (Arvind Kejriwal) वाढू लागल्या आहेत. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही केजरीवाल यांनी चौकशीसाठी जाण्यास नकार दिला. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना अटकच होऊ शकते, असा अंदाज आप नेत्यांनी लावला आहे. इतकेच नाही तर आप नेत्या आतिशी मार्लेना यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित केजरीवाल यांना अटक होऊ शकते, असा दावा केला. त्यांच्या या दाव्यानंतर आज सकाळपासूनच दिल्लीतील राजकारण ढवळून निघत आहे. दरम्यान, आज केजरीवाल यांना अटक होऊ शकते अशी शक्यता वाट असल्याने त्यांच्या दिल्लीतील घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
तिसऱ्यांचा ईडीची नोटीस; चौकशीसाठी बोलविले पण अरविंद केजरीवालांनी दिल्ली सोडली
ईडीने केजरीवाल यांना 3 जानेवारीला तिसऱ्यांदा समन पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. परंतु, केजरीवाल यांनी ही नोटीसच बेकायदेशीर असल्याचे म्हणत चौकशीसाठी नकार दिला. लोकसभा निवडणुकीत केजरीवाल यांना प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी केंद्र सरकारचा हा डाव असल्याचा आरोप आप नेत्यांनी केला आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसनेही केजरीवाल यांना सल्ला देत सांगितले आहे की केजरीवाल यांनी कायद्याला सामोरे गेले पाहिजे.
दरम्यान, यापूर्वी मद्य घोटाळ्यात केजरीवाल यांना 18 डिसेंबरला, 21 डिसेंबरला समन्स बजाविण्यात आले होते. परंतु केजरीवाल हे चौकशीसाठी गेले नाहीत. ते पंजाबमधील होशियापूर येथे दहा दिवसांच्या विपश्यनासाठी गेले होते. याप्रकरणी केजरीवाल यांना पुन्हा समन्स आले आहे. ते पुन्हा पंजाबमध्ये जाणार आहेत. ईडीच्या समन्सवर केजरीवाल म्हणाले, मी कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यास तयार आहेत. परंतु इडीचे समन्सही बेकायदेशीर आहेत. हे समन्स राजकीयदृष्या प्रेरित आहेत. त्यामुळे त्या मागे घ्याव्यात, अशी माझी मागणी आहे.
News coming in that ED is going to raid @ArvindKejriwal’s residence tmrw morning. Arrest likely.
— Atishi (@AtishiAAP) January 3, 2024
ईडीच्या चार्जशिटमध्ये केजरीवालांचे नाव
मद्य घोटाळ्याप्रकरणात केजरीवाल सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले मनिष सिसोदिया हे अटकेत आहेत. त्यांना अद्यापही जामिन मिळालेला नाही. तर ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात केजरीवाल यांचे नाव आहे. या मद्य घोटाळ्यात ईडीबरोबर सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सीबीआयने चौकशीसाठी बोलविले होते. परंतु केजरीवाल हे चौकशीसाठी जात नाहीत. केजरीवाल यांना आता ईडी मनी लॉड्रिंग प्रकरणात पीएमएलए कायद्यानुसार समन्स काढण्यात आले आहे.