SIR वरून वाद पेटला, भाजप नेत्याचा ज्ञानेश कुमारांना खुला पाठिंबा; थेट पद्मभूषण देण्याची मागणी

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्षांनी त्यांना पद्मभूषण देण्याची मागणी केली.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 25T185140.378

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Election) यांच्या भूमिकेवरून देशातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष शमीक भट्टाचार्य यांनी त्यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीतील सुधारणांसाठी ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेचं कौतुक करत, त्यांना किमान पद्मभूषण पुरस्कार देण्यात यावा, असं भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे. त्यांचं हे वक्तव्य विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच्या पार्श्वभूमीवर आलं आहे.

भट्टाचार्य यांच्या मते, पश्चिम बंगालमध्ये शांततापूर्ण मतदान आणि मतदार यादीतील दुरुस्तीच्या प्रक्रियेत ज्ञानेश कुमार यांची भूमिका महत्त्वाची होती. मृत आणि कथित बनावट मतदारांची नावं वगळून पात्र मतदारांचं मतदानाचं अधिकार पुन्हा सुनिश्चित करण्यात त्यांच्या नेतृत्वाखाली काम झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे पश्चिम बंगालमधील जनतेला त्यांच्या कामाचा फायदा झाल्याचं भट्टाचार्य यांनी सांगितलं.

देशातील गद्दारांना पहिला बूट मीच फेकून मारेन; ज्ञानेश कुमारांवर संजय राऊतांचा घणाघात

मात्र, दुसरीकडे SIR म्हणजेच विशेष सघन पुनरावलोकन प्रक्रियेवरून विरोधकांकडून निवडणूक आयोगावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या 10 महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर किमान 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवले होते. या आक्षेपांमध्ये मतदारांची नोंदणी, नावं वगळणं, मतदारांच्या डेटाचा वापर आणि SIR प्रक्रियेशी संबंधित निर्णयांचा समावेश असल्याचं वृत्त आहे.

या वृत्तानंतर काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची किंवा पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. 25 सप्टेंबरला काँग्रेसकडून देशभरात निदर्शनंही करण्यात आली. दरम्यान, निवडणूक आयोगाने अंतर्गत मतभेदांना प्रक्रियेतील चर्चेचा भाग मानत अंतिम निर्णय सर्वानुमते झाल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एका बाजूला ज्ञानेश कुमार यांच्या समर्थनार्थ भाजप नेत्याचं वक्तव्य, तर दुसरीकडे SIR प्रक्रियेवरून विरोधकांचे आरोप, असा दुहेरी राजकीय सूर सध्या पाहायला मिळत आहे.

follow us