महाकुंभात वादाचं पाणी! गंगा-यमुनेचं पाणी प्रदुषित, स्नान धोकादायक; अहवालात नेमकं काय?

Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात महाकुंभ पर्व मोठ्या उत्साहात अन् भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. दररोज कोट्यावधी भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करत आहेत. या ठिकाणी स्नान केल्याने पापं नाहिशी होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे तब्बल 144 वर्षांनंतर जुळून आलेला महाकुंभ अन् यातील स्नानाची पर्वणी साधण्यासाठी प्रयागराज गर्दीनं फुलून गेलं आहे. पण, प्रयागराजधून वाहणाऱ्या याच नदीच्या पाण्यात विष्ठेतील जीवाणू असतील तर.. डोक्यात नुसता विचार आला तरी संताप येतो. पण, हे खरं आहे. प्रयागराजमधून वाहणाऱ्या गंगा आणि यमुना या नद्यांच्या पाण्यात विष्ठेत असणारे जिवाणू आढळल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे. या अहवालात नेमकं काय म्हटलंय, खरंच असं काही घडलं आहे का याची माहिती घेऊ..
अहवालात नेमकं काय?
प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा अहवाल 3 फेब्रुवारीला तयार केला होता. त्यानंतर अहवाल एनजीटीच्या मु्ख्य खंडपीठाला सादर करण्यात आला होता. या अहवालानुसार गंगा आणि यमुना नद्यांतील पाणी सहा मानकांच्या आधारे तपासण्यात आले. या पीएच पातळी, फिकल कोलीफॉर्म, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, केमिकल ऑक्सिजन डिमांड आणि डिजॉल्वड ऑक्सिजन या घटकांचा समावेश होता. या पाण्यात फिकल कोलीफॉर्मची पातळी मात्र जास्त आढळून आली. साधारणपणे 1 मिलीलीटर पाण्यात फिकल कोलॉफॉर्मचे प्रमाण 100 असले पाहिजे. पण, अमृत स्नानाच्या आधी पाण्याच्या एका नमुन्याची तपासणी केली असता यात कॉलीफॉर्मचे प्रमाण 2300 इतके आढळून आले.
धक्कादायक! संगमातील पाणी प्रदुषित, स्नानासाठी योग्य नाही; केंद्रीय मंडळाचाच अहवाल
कॉलीफॉर्म बॅक्टेरिया वाढला
प्रयागराज शहरातील संगम क्षेत्राच्या आसपास गंगा आणि यमुना नद्यांतील पाणी अतिशय प्रदुषित आहे. संगम स्थळावरून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यात फिकल कॉलीफॉर्म बॅक्टेरियाचे प्रमाण प्रति मिलीलीटर 100 ऐवजी 2000 आढळून आले. सीपीसीबीच्या मानकांनुसार हे पाणी सी कॅटेगरीत येते. याचा अर्थ पाणी इतके प्रदुषित आहे की या पाण्याने स्नान करणे सुद्धा शक्य नाही.
वाराणसीतील वकील सौरभ तिवारी यांनी प्रयागराजमधील गंगा आणि यमुनेच्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची राष्ट्रीय हरित लवादाकडून सुनावणी सुरू आहे. महाकुंभ सुरू असताना शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्यांत सोडले जात असल्याचे आरोप होत आहेत. या आरोपांचीही शहानिशा लवादाकडून केली जात आहे.
एनजीटीने यूपी प्रदूषण मंडळाला फटकारले
लवादाने बुधवारी या मुद्द्यावर उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला चांगलेच फटकारले. उत्तर प्रदेश मंडळाने जो अहवाल सादर केला आहे त्यात गंगेच्या पाण्यातील एफसी आणि ऑक्सिजनच्या पातळीसारखे पाण्याच्या गुणवतेत्या मापदंडांविषयी अन्य तपशील पुरेसे सादर केलेले नाहीत असे एनजीटीने म्हटले. इतकेच नाही तर विविध ठिकाणचे पाणी नमुने गोळा करून पाणी गुणवत्तेचा ताजा अहवाल एक आठवड्यात सादर करा अशा सूचना एनजीटीने दिल्या आहेत.
महाकुंभाच्या आधीही पाणी तपासणी
विशेष म्हणजे भाविक ज्या ठिकाणी स्नान करत आहेत त्या सर्व ठिकाणचे पाण्याचे नमुने 12,13 जानेवारीला घेण्यात आले होते. त्यानंतर याही नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या पाण्यात फिकल कॉलीफॉर्म (एफसी) हे विष्ठेत आढळणारे जीवाणू सापडले. यानंतर त्रिवेणी संगमाच्या वरील भागात ताजे पाणी सोडले गेले. यामुळे पाण्यातील प्रदूषण कमी झाल्याचा दावा करण्यात आला होता.
सीएम योगींना दावा फेटाळला
संगमाच्या पाण्यात विष्ठेतील जिवाणू आढळत असल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फेटाळला आहे. पाणी आचमन आणि स्नान करण्यासाठी योग्य असल्याचा दावा त्यांनी विधानसभेत केला. उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाण्याच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवत असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते.
दु्र्दैवचं! एक घोषणा अन् होत्याचं नव्हतं, चोरट्यांनीही केला हात साफ; वाचा चेंगराचेंगरीची एक-एक घटना…
सीपीसीबी अहवालातील ठळक मुद्दे
गंगा नदीतील पाणी स्नानासाठी असुरक्षित
महाकुंभात कोणत्याही वेळी 50 लाख ते 1 कोटी भाविकांची उपस्थिती
दररोज किमान 16 दशलक्ष लीटर मलमूत्राच्या पाण्याची निर्मिती
दररोज किमान 240 दशलक्ष लीटर सांडपाण्याची निर्मिती
पाण्यातील जैविक घटकांच्या विश्लेषणासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण ठराविक मर्यादेपेक्षा जास्त