CJP Protest : जंतर-मंतरवरील आंदोलनात ‘जॅमर’ चर्चेत; पण मोबाईल नेटवर्क नेमकं बंद कसं होतं?

CJP Protest दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी अचानक मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा बंद पडल्याचा दावा केला

  • Written By: Published:
Delhi CJP Protest

Delhi CJP Protest & Mobile Jamar : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांनी परिसरात अचानक मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा बंद पडल्याचा दावा केला. काही आंदोलकांनी परिसरात मोबाईल जॅमर लावण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर सोशल मीडियावरही याबाबत मोठी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर ‘मोबाईल जॅमर’ नेमकं काय असतं, ते कसं काम करतं आणि त्याचा मोबाईल नेटवर्कवर नेमका काय परिणाम होतो, हे जाणून घेऊया.

मोबाईल जॅमर म्हणजे काय?

मोबाईल जॅमर हे असे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, जे ठराविक परिसरातील मोबाईल नेटवर्क तात्पुरते निष्क्रिय करण्यासाठी वापरले जाते. हे उपकरण मोबाईल फोन आणि मोबाईल टॉवर यांच्यातील संपर्क खंडित करते. त्यामुळे त्या परिसरात इंटरनेट, कॉलिंग आणि एसएमएस सेवा काही काळासाठी बंद पडतात. याचा वापर सामान्यतः व्हीआयपी दौरे, परीक्षा केंद्रे, संवेदनशील सरकारी कार्यालये, तुरुंग, लष्करी क्षेत्र, बॉम्ब निकामी करण्याच्या कारवाया आणि मोठ्या सुरक्षा बंदोबस्तादरम्यान केला जातो.

जॅमर कसं काम करतं?

मोबाईल नेटवर्क हे विशिष्ट रेडिओ फ्रिक्वेन्सीवर (Radio Frequency)  कार्यरत असते. मोबाईल टॉवर आणि तुमचा फोन यांच्यात सतत सिग्नलची देवाणघेवाण सुरू असते. जॅमर सुरू झाल्यानंतर ते 3G, 4G आणि 5G नेटवर्क वापरत असलेल्या त्याच फ्रिक्वेन्सीवर अधिक शक्तिशाली रेडिओ वेव्ह्ज प्रसारित करते. या वेव्ह्जमुळे मोबाईल टॉवरकडून येणारे मूळ सिग्नल फोनपर्यंत पोहोचू शकत नाहीत. परिणामी मोबाईल नेटवर्क पूर्णपणे खंडित होते. यामुळे  मोबाईलमध्ये नेटवर्क दिसत नाही,  इंटरनेट सेवा बंद होते, व्हॉईस कॉल करता येत नाहीत, एसएमएस पाठवता किंवा स्वीकारता येत नाहीत. तर, अनेक फोनमध्ये ‘No Service’, ‘No Network’ किंवा ‘Emergency Calls Only’ असा संदेश दिसू शकतो.

जॅमरचा परिणाम किती परिसरात होतो?

प्रत्येक जॅमरची क्षमता वेगळी असते. काही पोर्टेबल जॅमर फक्त काही मीटरपर्यंतच प्रभाव टाकतात, तर उच्च क्षमतेचे जॅमर शेकडो मीटरपर्यंत नेटवर्कवर परिणाम करू शकतात. मात्र, ते फक्त त्यांच्या रेंज असलेल्या उपकरणांवरच प्रभाव टाकतात.

जॅमर लावण्यामागचं कारण काय?

सुरक्षा यंत्रणा काही वेळा संवेदनशील परिस्थितीत जॅमरचा वापर करतात. यामागे काही प्रमुख कारणे असतात. जसे की,  आंदोलक किंवा संशयितांमधील रिअल-टाइम समन्वय मर्यादित करणे. संवेदनशील कारवायांचे थेट प्रक्षेपण रोखणे. रिमोटद्वारे नियंत्रित होणाऱ्या स्फोटकांचा संभाव्य धोका कमी करणे किंवा व्हीआयपी सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखणे. मात्र, प्रत्येक आंदोलनात किंवा प्रत्येक नेटवर्क बंद पडण्यामागे जॅमरच कारणीभूत असतो, असे नसते. अनेकदा मोबाईल नेटवर्कवर अचानक वाढलेला ताण किंवा तांत्रिक बिघाडामुळेही सेवा विस्कळीत होऊ शकते.

भारतात जॅमर कोण वापरू शकते?

भारतात मोबाईल जॅमरचा वापर सर्वसामान्य नागरिकांना करता येत नाही. वायरलेस संप्रेषणात हस्तक्षेप करणारी ही उपकरणे केंद्र सरकारने अधिकृत केलेल्या सुरक्षा आणि सरकारी संस्थांनाच विशिष्ट परिस्थितीत वापरण्याची परवानगी असते. अनधिकृतपणे जॅमरचा वापर करणे कायद्याने गुन्हा मानला जातो.

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जॅमरच्या वापराबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली असली, तरी अशा उपकरणांचा वापर केवळ सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी, मर्यादित कालावधीसाठी आणि ठराविक परिसरातच केला जातो. त्यामुळे एखाद्या ठिकाणी अचानक नेटवर्क गायब झाल्यास त्यामागे जॅमर असू शकतो, मात्र प्रत्येक वेळी तेच कारण असेल असे गृहित धरणे योग्य ठरणार नाही.

follow us