16 तासांहून अधिक काम, मोबदला मात्र शून्य; विनावेतन कामात भारत जगात नंबर 1
16 तास किंवा त्याहून अधिक विनावेतन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणात भारत 24 टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
भारतातील कामाच्या वाढत्या तासांबरोबरच (India) विनावेतन अतिरिक्त कामाचा गंभीर प्रश्नही समोर आला आहे. एडीपीच्या ‘People at Work 2026’ या अहवालानुसार, जगभरातील देशांमध्ये भारतातील कर्मचारी सर्वाधिक विनावेतन अतिरिक्त तास काम करत आहेत. 2025 मध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात 36 देशांतील 39,000 हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता.
अहवालातील आकडेवारीनुसार, भारतातील 24 टक्के कर्मचारी आठवड्याला 16 तास किंवा त्याहून अधिक अतिरिक्त काम करतात, मात्र या कामासाठी त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही. तर 40 टक्के कर्मचारी आठवड्याला 6 ते 15 तास विनावेतन काम करत असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच सर्वेक्षणातील भारतीय कर्मचाऱ्यांपैकी जवळपास दोन-तृतीयांश कर्मचारी आठवड्याला किमान 6 अतिरिक्त तास काम करत आहेत.
16 तास किंवा त्याहून अधिक विनावेतन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणात भारत 24 टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तुर्कस्तानमध्ये हे प्रमाण 23 टक्के, ऑस्ट्रियात 21 टक्के तर अमेरिकेत 20 टक्के आहे. याउलट झेक प्रजासत्ताकमध्ये केवळ 4 टक्के कर्मचारी इतके अतिरिक्त विनावेतन काम करत असल्याचे सांगण्यात आले. चीन, तैवान आणि जपानमध्ये हे प्रमाण सुमारे 6 टक्के आहे.
जागतिक पातळीवर भारताच्या तुलनेत परिस्थिती काहीशी दिलासादायक आहे. जगभरातील 62 टक्के कर्मचारी आठवड्याला 5 तास किंवा त्याहून कमी विनावेतन काम करतात, तर 26 टक्के कर्मचारी 6 ते 15 तास आणि 12 टक्के कर्मचारी 16 तास किंवा त्याहून अधिक विनावेतन काम करतात. एडीपीच्या मते, कार्यालयीन वेळ संपल्यानंतर काम सुरू ठेवणे, तसेच जेवणाच्या सुट्टीतही काम करणे याचाही विनावेतन कामामध्ये समावेश होतो.