खर्गे यांच्या ‘शुद्धीकरण’ प्रकरणात 29 दिवसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा; अखेर उत्तराखंड पोलिसांकडून कारवाई
Mallikarjun Kharge: खर्गे यांच्या हल्द्वानी येथील रामलीला मैदानावरील सभेच्या दोन दिवसांनंतर, म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी भाजपच्या संबंधित कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण विधी केला होता.
Congress president Mallikarjun Kharge ‘purification’ row : काँग्रेस (Congress)अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ( Mallikarjun Kharge ) यांनी हल्द्वानी येथे ज्या ठिकाणी सभा घेतली होती, त्या ठिकाणी कथित ‘शुद्धीकरण’ सोहळा झाला होता. या घटनेनंतर देशातील राजकारण तापले होते. तसेच गुन्हा नोंदविण्याची मागणी झाली होती. त्यानंतर तब्बल 29 दिवसांनी उत्तराखंड पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या दलित आणि आदिवासी खासदारांनी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी धाव घेतली होती.
खर्गे यांच्या हल्द्वानी येथील रामलीला मैदानावरील सभेच्या दोन दिवसांनंतर, म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी भाजपच्या संबंधित कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण विधी केला होता. या घटनेविरोधात काँग्रेसकडून सातत्याने कारवाईची मागणी केली जात होती. दरम्यान, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी करणाऱ्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला होता. मात्र, ‘शुद्धीकरण’ सोहळा करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याने काँग्रेसने पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले होते.
फडणवीसांचे 7 महत्त्वपूर्ण निर्णय; खेळाडू, आरोग्य, न्यायव्यवस्था आणि उद्योग क्षेत्राला मोठा लाभ!
कोणत्या कलमानुसार गुन्हा ?
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 196 आणि 299 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 196 अंतर्गत धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा आदींच्या आधारावर विविध गटांमध्ये वैर निर्माण करणे तसेच सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या कृत्यांचा समावेश होतो. तर कलम 299 हे एखाद्या वर्गाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून आणि द्वेषपूर्ण कृत्यांशी संबंधित आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या कलम 3(1)(r) अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमात सार्वजनिक ठिकाणी अनुसूचित जाती किंवा जमातीच्या सदस्याचा जाणूनबुजून अपमान किंवा त्याला धमकावून मानहानी करण्यासंदर्भातील तरतूद आहे.
दिल्लीतील पोलीस ठाण्यात काँग्रेस खासदारांचा ठिय्या
या प्रकरणावरून मंगळवारी दिल्लीतही मोठा राजकीय गदारोळ उडाला. काँग्रेसच्या दोन डझनहून अधिक खासदारांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात ठिय्या देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी सुरुवातीला ‘झिरो एफआयआर दाखल करण्यास नकार दिल्याने खासदारांनी पोलीस ठाणे सोडण्यास नकार दिला. काँग्रेसचे खासदार कोडिकुन्निल सुरेश, ससिकांत सेंथिल, मल्लू रवी आणि वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसच्या एससी, ओबीसी, अल्पसंख्याक आणि आदिवासी विभागाचे समन्वयक के. राजू तसेच एससी विभागाचे प्रमुख राजेंद्र पाल गौतम हे सुमारे साडेतीन तास पोलीस ठाण्यात उपस्थित होते.
काँग्रेस नेत्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते पोलिसांकडे FIR दाखल करण्याचा आग्रह धरताना दिसत आहेत. पोलिसांकडे आवश्यक कर्मचारी नसल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी तीन दिवस लागतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचा दावा नेत्यांनी केला.