Corona चा धोका वाढला ! सहा महिन्यांत देशात पहिल्यांदाच सापडले ‘इतके’ रुग्ण..
Corona Update : देशभरात आटोक्यात आलेल्या कोरोना (Corona) विषाणूचा वेग मागील काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. देशात मागील 24 तासात 3 हजार 824 नवीन रुग्ण (Corona Cases in India) आढळले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील हा उच्चांक आहे. याबरोबरच सक्रिय रुग्णांची संख्याही 18 हजार 389 पर्यंत पोहोचली आहे. या विषाणूमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण मृत्यूंची संख्या आता 5 लाख 30 हजारांच्याही पुढे गेली आहे. कोरोना बाधितांचा आकडाही 4 कोटी 47 लाखांच्या पुढे गेला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या बुलेटिननुसार शनिवारी 2 हजार 994 रुग्ण आढळले होते. त्यातुलनेत आजच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या एकूण संसर्गाच्या 0.04% सक्रिय केस आहेत. दैनिक सकारात्मकता दर 2.87% नोंदवला गेला आहे. तर साप्ताहिक दर 2.24% आहे. आतापर्यंत देशभरात 4.41 कोटीहून अधिक लोक कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृत्यूदर 1.19% नोंदवला गेला.
मोठा दिलासा! गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घट; नवीन आर्थिक वर्षाचं गिफ्ट
राजधानी दिल्ली शहरात या आजाराचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. काल 416 नवे रुग्ण सापडले होते. गेल्या सात महिन्यांतील हा उच्चांक आहे. तर पॉजिटिविटी रेट 14.37 टक्के इतका आहे. मागील 24 तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या 26 हजार 529 झाली आहे.
देशातील दैनंदिन प्रकरणांपैकी 90 टक्के प्रकरणे दहा राज्यांमध्ये आहेत. केरळमध्ये 884, महाराष्ट्र 669, दिल्ली 416, गुजरात 372, हिमाचल प्रदेश 354, कर्नाटक 247, तामिळनाडू 156, हरियाणा 142, गोवा 117 आणि उत्तर प्रदेश 113 आहेत.
या राज्यांचा एकूण आकडा 3,470 आहे. म्हणजेच गेल्या 24 तासात प्राप्त झालेल्या प्रकरणांनुसार एकट्या या 10 राज्यांमध्ये 90 टक्के रुग्ण आढळले आहेत. 24 तासांत 5 जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये केरळमधील दोन, दिल्लीतील एक, हरियाणातील एक आणि राजस्थानमधील दोन रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, देशात आज सलग तिसऱ्या दिवशी तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. या संसर्गामुळे पाच रुग्ण दगावले आहेत. सध्या विविध दवाखान्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15 हजार 2085 इतकी आहे. याआधी गुरुवारी 3 हजार 06 रुग्ण आढळले होते. मागील 24 तासात ही संख्या 3 हजार 95 होती. मागील सहा महिन्यातील एका दिवसातील ही सर्वाधिक प्रकरणे आहेत.