‘मी ठणठणीत मला संसद मोर्चात जायचयं, कृपया मला डिस्चार्ज द्या’; वांगचुक यांचे रुग्णालयाला पत्र

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांनी रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून डिस्चार्ज देण्याची विनंती केली आहे.

  • Written By: Published:
Letsupp Image   2026 07 20T121535.549
Sonam Wangchuk Writes Letter To Hospital For Joining CJP March :  लडाखचे सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून स्वतःला काही काळासाठी रुग्णालयातून बाहेर जाण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. ‘संसद चलो’ मोर्चात सहभागी होण्यासाठी ही परवानगी देण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली. “माझी प्रकृती आता चांगली आहे. माझे सर्व वैद्यकीय व्हायटल्स सामान्य आहेत. त्यामुळे कृपया मला काही काळासाठी रुग्णालयातून बाहेर जाण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून मी आज संसदेकडे निघालेल्या ‘संसद चलो’ मोर्चात सहभागी होऊ शकेन,” असे वांगचुक यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

‘मी ताब्यात नसेल तर निर्बंध का?’

वांगचुक यांनी हे पत्र त्यांच्या अधिकृत एक्स (X) खात्यावरही शेअर केले. त्यासोबत त्यांनी लिहिले की, “मी तुम्हा सर्वांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे. माझी प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालय सांगत आहे आणि मी पोलिस कोठडीत नसल्याचा दावाही केला जात आहे. मग माझ्यावर निर्बंध का घालण्यात आले आहेत?” असा प्रश्नदेखील वांगचुक यांनी पत्रात उपस्थित केला आहे.

रुग्णालयाचे हेल्थ बुलेटिन काय म्हणते?

दरम्यान, सफदरजंग रुग्णालयाने सोमवारी (दि.20) सकाळी हेल्थ बुलेटिन जारी करत वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. त्यांच्या सर्व व्हायटल्स सामान्य असल्या तरी रक्तातील काही घटकांवर सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. तसेच AIIMS आणि VMMC-सफदरजंग रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही नमूद करण्यात आले.

21 दिवसांच्या उपोषणानंतर रुग्णालयात दाखल

सोनम वांगचुक यांनी 28 जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार, NEETसह विविध परीक्षांमधील पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने उत्तरदायित्व स्वीकारावे, या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

उपोषणाच्या 21व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले होते. आता प्रकृती सुधारल्याचा दावा करत त्यांनी पुन्हा आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्याने या प्रकरणाकडे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

follow us