मोठी बातमी! 1300 कोटींच्या घोटाळ्यात सत्येंद्र जैन, सिसोदियांवर FIR नोंदवण्यास मंजुरी

मोठी बातमी! 1300 कोटींच्या घोटाळ्यात सत्येंद्र जैन, सिसोदियांवर FIR नोंदवण्यास मंजुरी

FIR against Manish Sisodia and Satyendra Jain : दिल्लीतील सत्तेतून बेदखल झाल्यानंतर आम आदमी पार्टीच्या अडचणी सातत्याने वाढत चालल्या आहेत. या पक्षातील नेते देखील आता संकटाने घेरले जाऊ लागले आहेत. आताही माजी मंत्री मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना धक्का देणारी बातमी आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 1300 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणी या दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यास मंजुरी दिली आहे. दिल्लीतील सरकारी शाळांच्या वर्गखोल्या बांधताना हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीचे सरकार होते. या सरकारच्या काळात मनीष सिसोदिया शिक्षणमंत्री होते तर सत्येंद्र जैन आरोग्यमंत्री होते. मंत्रि‍पदावर असताना सिसोदिया आणि जैन यांनी केलेल्या घोटाळ्या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यास राष्ट्रपतींनी देखील मंजुरी दिली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय दक्षता आयोग अर्थात सीव्हीसीने 17 फेब्रुवारी 2020 रोजी एक रिपोर्ट दिला होता. या अहवालात सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्लीतील सरकारी शाळांत 2400 हून अधिक वर्गखोल्यांच्या बांधकामात अनिमितता आढळून आली असे स्पष्टपणे नमूद केले होते.

भाजपाच्या लाटेत दिग्गज भुईसपाट! केजरीवाल, सिसोदियांचा पराभव; ‘आप’ला मोठा धक्का

मनीष सिसोदिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री सुद्धा राहीले आहेत. कथित दारू घोटाळ्यात सीबीआयने त्यांना अटक केली होती. दारू धोरण लागू करण्यात सिसोदियांनी अनियमितता केली आणि भ्रष्टाचार केला असा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआय आणि ईडीचा आरोप आहे की मनीष सिसोदिया यांनी काही खासगी कंपन्यांना फायदा व्हावा अशा पद्धतीने दारू धोरण तयार केले होते. दारू व्यापाऱ्यांकडून 100 कोटी रुपयांची लाच घेण्यात आली. या पैशांचा वापर गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी करण्यात आला. या प्रकरणात मनीष सिसोदिया यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.

केजरीवाल सरकारमध्ये सत्येंद्र जैन आरोग्यमंत्री होते. त्यांना 30 मे 2022 रोजी ईडीने मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अटक केली होती. जैन यांनी 2015-2016 साली बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 16.39 कोटी रुपयांची मनी लाँड्रिंग केली होती. आता सत्येंद्र जैन यांच्यासह मनीष सिसोदिया यांच्याही अडचणी वाढणार आहेत. यानंतर आम आदमी पार्टीने भाजपवर जोरदार टीका केली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध दाखल होणार गुन्हा, ‘त्या’ प्रकरणात कोर्टाचे दिल्ली पोलिसांना आदेश

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube