इलेक्शनआधी दलबदलूंचं टेन्शन! तिकीटासाठी गर्दी अन् धक्कातंत्राची तयारी; हरियाणात काय घडतंय?
Haryana Elections 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा (Haryana Elections) झाल्यानंतर राज्यात घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. नेते मंडळींच इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरू झालं आहे. दलबदलू नेते पक्षाचा विचार न करता फक्त आपल्यासाठी सेफ जागेच्या शोधात आहेत. काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला तर काही नेते १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष ठेऊन आहेत.
तोशाम मतदारसंघाच्या आमदार किरण चौधरी ज्यांनी जून महिन्यातच काँग्रेसचा (Congress Party) राजीनामा दिला होता. त्यांना भाजपने राज्यसभेसाठी नामांकित केले होते. तर दुसरीकडे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या जजपा पक्षाचे आमदार राम करण काला यांनी नुकताच काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत किरण चौधरी यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी सांगितले की जजपाचे दोन आमदार या उमेदवारीला पाठिंबा देत आहेत. आमदार रामनिवास सुरजाखेडा आणि आमदार जोगी राम सिहाग लवकरच भाजपात सहभागी होतील अशी शक्यता आहे.
दलबदलूंचा जेजेपीला सर्वाधिक फटका
नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडल्याने जनता जननायक पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. राम करण काला काँग्रेसमध्ये गेले तर दोन आमदार केव्हाही भाजपात प्रवेश करू शकतात. तर दुसरीकडे चार बंडखोर आमदारांनी अजून आपले पत्ते उघडलेले नाहीत. टोहाना मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र बनली यांनी सांगितले की मी लवकरच समर्थकांची एक बैठक आयोजित करणार आहे. भविष्यातील योजनांची घोषणा याच बैठकीत करणार आहे. दोन आमदारांनी भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवार किरण यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. आता हे दोन्ही आमदार भाजपात प्रवेश करणार का याची उत्सुकता आहे.
काँग्रेसचे 99 खासदार टेन्शन फ्री! न्यायालयाने याचिका फेटाळली, जाणून घ्या सविस्तर..
लोकसभेत दलबदलूंवर भाजपाची मदार
लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांवर जरा जास्तच विश्वास ठेवला होता. त्यांच्या १० पैकी ३ उमेदवार निवडणुकीच्या आधी पक्षात सामील झाले होते. मार्च महिन्यात भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर उद्योजक आणि काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदल यांनी पुन्हा भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. कुरुक्षेत्र मतदारसंघात त्यांना विजय मिळाला. काँग्रेसचे आणखी एक माजी खासदार अशोक तंवर यांनी जानेवारी महिन्यात भाजपात प्रवेश केला होता. मात्र सिरसा मतदारसंघात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
माजी अपक्ष आमदार रणजित चौटाला आधी इंडीयन नॅशनल लोकदलात (Indian National Lok Dal) होते. मार्च महिन्यात त्यांनी भाजपात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) हिसार मतदारसंघात त्यांना पराभवाचा झटका बसला.
भाजपातही दलबदलूंची चलती
सत्ताधारी भाजपात सुद्धा दलबदलू नेत्यांची संख्या वाढली आहे. माजी केंद्रीय मंत्री बिरेन सिंह आणि त्यांचा मुलगा हिसारचे माजी खासदार ब्रिजेंद्र हिसार जागेसाठी आघाडीवर होते. काँग्रेसने मात्र जयप्रकाश यांना तिकीट दिले. त्यांनी रणजित चौटाला यांचा पराभव केला. आता काँग्रेसकडून विधासभा निवडणुकीत ब्रजेंद्रा यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
रणजित चौटाला भाजपला डोकेदुखी
रणजित चौटाला यांच्या बंडखोरीचा भाजपला सामना करावा लागू शकतो. रणजित चौटाला यांनी भाजपात सहभागी होईपर्यंत भाजपला पाठिंबा दिला होता. माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि विद्यमान मुख्यमंत्री नायब सिंह सैन यांच्या अधीन मंत्री म्हणून काम केले. आता त्यांनी भाजपशी दोन हात करण्याचे संकेत दिले आहेत. तिकीट मिळो अथवा न मिळो रनिया मतदारसंघातून लढणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
जम्मू काश्मीरचे 16 मतदारसंघ किंगमेकर; भाजपला धक्का, काँग्रेसला मात्र फिलगुड
अपक्षांचा भाजपला दणका
या वर्षातील मे महिन्यात तीन अपक्ष आमदारांनी भाजपाचा पाठिंबा काढून घेतला होता. नंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा केली. 2019 मध्ये या तीन आमदरांना उमेदवारी देण्यास भाजपने नकार दिला होता. नंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली आणि आमदार झाले. यावेळी काँग्रेस आपल्याला तिकीट देईल असे या आमदारांना वाटत आहे.