हरियाणात राजकीय भूकंप! भाजप-जेजेपी युती तुटली; CM खट्टर यांचा राजीनामा
Haryana News : देशात लोकसभा निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत. त्यामुळे केंद्रातील (Haryana News) सत्ताधारी भाजप दुरावलेल्या मित्रांना पुन्हा जोडण्यात व्यस्त असतानाच हरियाणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या भुकंपाचे हादरे भाजपला बसले आहेत. लोकसभा निवडणुकीआधीच राज्यातील भाजप आणि जेजेपी युती तुटली आहे. चंदीगडमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी त्यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला.
राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. खरंतर यातून भाजपलाच फायदा होताना दिसत आहे. कारण, युती तुटली असली तरी अपक्षांना सोबत घेत भाजपने सरकार वाचविल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत राजकीय चित्र लवकरच स्पष्ट होणार असून पुन्ही मनोहरलाल खट्टर हेच मुख्यमंत्री होतील असे सांगण्यात येत आहे.
Manohar Lal Khattar resigns as CM of Haryana pic.twitter.com/mV311cH8jm
— ANI (@ANI) March 12, 2024
हरियाणात आता भारतीय जनता पार्टीचे पर्यवेक्षक अर्जुन मुंडा आणि तरुन चुघ दाखल झाले आहेत. दोन्ही पक्षांची युती तुटणार हे आधीच सांगितले जात होते. हरियाणात विधानसभेच्या 90 जागा आहेत. सध्या 90 पैकी भाजपकडे 41 तर काँग्रेसचे 30 आमदार आहेत. आयएनएलडी पक्षाचे 10, एचएलपीकडे एक आणि सात अपक्ष आमदार आहेत. बहुमतासाठी 46 आकडा महत्वाचा आहे. याआधी भाजपने जेजेपी पक्षाला सोबत घेत सरकार स्थापन केले होते. या पक्षाचे प्रमुख दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले होते.
Lok Sabha Election : ‘यूपी’त आघाडी टिकणार; काँग्रेसच्या फॉर्म्यूल्याने जागावाटपाचा तिढा सुटला
सत्ताधारी पक्षांत आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटपाबाबत चर्चा सुरू होती. परंतु, या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यामुळे युती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. युती तुटली असली तरी त्याचा भाजपवर फारसा परिणाम होणार नाही, अशीच येथील सध्याची राजकीय परिस्थिती आहे. भाजपकडे 41 आमदार आहेत. सात अपक्ष आमदारांचा भाजपलाच पाठिंबा आहे. आणखी एका आमदाराने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बहुमतापेक्षाही जास्त जागा भाजपला मिळताना दिसत आहे.