झारखंडच्या निवडणुकीत ‘या’ नेत्यांची परीक्षा; पराभव झाला तर राजकारणच धोक्यात..
Jharkhand Assembly Elections 2024 : झारखंडमध्ये तिकीट वाटपानंतर राजकीय चित्र बदललं (Jharkhand Assembly Elections) आहे. भाजपात हालचाली वाढल्या आहेत. तिकीट न मिळाल्याने नाराज होत काही नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तर काही मतदारसंघांत बंडखोरी वाढली आहे. मागील पराभवातून शहाणपणा घेत भाजपने यंदा बरेच बदल केले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सहकारी पक्षांना सोबत घेण्याची रणनीती भाजपने आखली आहे. भाजपने ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन (आजसू) बरोबर आघाडी केली आहे. तसेच जेडीयू आणि लोक जनशक्ती पार्टीलाही काही जागा दिल्या आहेत.
दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चा सहकारी काँग्रेस, राजद आणि डाव्या पक्षांना सोबत घेत निवडणुकीत आहे. राज्यात पुन्हा सरकार येईल असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. या निमित्ताने जाणून घेऊ या की झारखंड निवडणुकीतील पाच महत्त्वाचे खेळाडू कोण आहेत आणि या निवडणुकीत त्यांचं काय पणाला लागलं आहे.
हेमंत सोरेन
मनी लॉड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन पाच (Hemant Soren) महिने तुरुंगात होते. २०१९ पासून आतापर्यंत त्यांनीच राज्याचे सरकार चालवल आहे. हेमंत सोरेन यांनी निवडणुकीत सरकारच्या योजनांना प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवले आहे. हेमंत सोरेन यांनी त्यांच्या कार्यकाळात सरना कोड प्रस्ताव आणि झारखंड डोमिसाईल बिल मंजूर करून मोठी खेळी केली आहे. आणि हा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) झामुमो आणि इंडिया आघाडीला याचा (INDIA Alliance) फायदा मिळाला. इंडिया आघाडीने राज्यातील अनुसूचित जनजाती (आदिवासी) साठी राखीव असणाऱ्या पाचही मतदारसंघांत विजय मिळवला होता.
बाबुलाल मरांडी
झारखंड निवडणुकीत दुसरे मोठे खेळाडू बाबुलाल मरांडी आहेत. मरांडी राज्याचे पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मरांडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी होण्याआधी आणि राजकारणात येण्याआधी शाळेत शिक्षक होते. मरांडी यांनी त्यावेळी राज्याच्या राजकारणात मोठी लोकप्रियता मिळवली होती. कारण त्यांनी १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत झामुमो प्रमुख शिबू सोरेन यांना (Shibu Soren) त्यांच्याच दुमका मतदारसंघात पराभूत केले होते. कालांतराने त्यांचे आणि भाजपचे संबंध बिघडले. यानंतर त्यांनी सन २००६ मध्ये झारखंड विकास मोर्चा (जनतांत्रिक) हा पक्ष स्थापन केला.
झारखंडमध्ये बदललाय घराणेशाहीचा ट्रेंड; मुलगा नाही तर सूना सांभाळताहेत राजकीय वारसा
२०१९ मधील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने मरांडी यांच्यापुढे मैत्रीचा हात केला. यानंतर २०२० मध्ये मरांडी पुन्हा भाजापत आले. हेमंत सोरेन यांच्यासमोर मोठा आदिवासी चेहरा म्हणून भाजपने बाबुलाल मरांडी यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद दिले. आता बाबुलाल मरांडी यांना या निवडणुकीत सिद्ध करायचे आहे की झारखंडच्या राजकारणात अजूनही त्यांचा दबदबा आहे. लोकसभा निवडणुकीत राखीव मतदारसंघांत भाजप पराभूत झाल्यानंतर मरांडी यांची जबाबदारी अधिक वाढली आहे.
हिंमता बिस्वा सरमा
आसामचे मुख्यमंत्री आणि हिंदुत्वाच्या राजकारणातील मोठा चेहरा म्हणून हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडे पाहीले जाते. झारखंड निवडणुकीत भाजपने त्यांना निवडणूक सह प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. सरमा यांनी झारखंड मध्ये बांगलादेशातून होत (Bangladesh) असलेल्या घुसखोरीचा मुद्दा मोठ्या त्वेषाने मांडला आहे. सरमा यांनी राजकीय कौशल्य दाखवत झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन, त्यांचा मुलगा बाबुलाल सोरेन आणि जुने नेते लोबीन हेमब्रोम यांना भाजपात आणलं.
मागील काही वर्षात सरमा नॉर्थ ईस्ट मधील राज्यांत भाजपचे मोठे रणानितिकार म्हणून पुढे आले आहेत. त्यांनी मागील आसाम विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व केले आणि अटीतटीच्या लढतीत भाजपला यश मिळवून दिले. आसाम बाहेरही प्रचाराच्या निमित्ताने भाजपने सरमा यांना वेळोवेळी महत्वाची जबाबदारी दिली आहे. जर झारखंड मध्ये भाजपने विजय मिळवला तर सरमा यांचे पक्षातील वजन आणखी वाढेल यात काहीच शंका नाही. म्हणून या निवडणुका त्यांच्यासाठी परीक्षा घेणाऱ्या ठरणार आहेत.
चंपई सोरेन
चंपई सोरेन यांचा जन्म सरायकेला खरसावा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला होता. झारखंड या स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्यासाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. १९९५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा सरायकेला मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली होती. यानंतर त्यांनी अनेकदा विजय मिळवला आणि झामुमोमध्येही सोरेन कुटुंबानंतर सर्वात लोकप्रिय नेता म्हणून स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली.
या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा तपास यंत्रणांनी हेमंत सोरेन यांना अटक केली तेव्हा चंपई सोरेन (Champai Soren) यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली होती. जवळपास पाच महिने त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला. हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मात्र त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. यानंतर मात्र चंपई सोरेन यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला. पक्षात अपमान होत असल्याचा मुद्दा पुढे करत ऑगस्ट महिन्यात त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
दलबदलू अन् वारसदारांची चांदी.. झारखंड भाजपाच्या पहिल्या यादीत आयारामांना लॉटरी!
भाजपनेही त्यांना पूर्ण सन्मान देत विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली. त्यांच्या मुलालाही तिकीट दिलं. आता सोरेन यांनी त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील मतदारसंघांत भाजपला यश मिळवून दिलं तर भाजपात त्यांचं राजकीय वजन नक्कीच वाढणार आहे.
कल्पना सोरेन
ज्यावेळी हेमंत सोरेन तुरुंगात होते त्यावेळी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी (Kalpana Soren) लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळली. झामुमो आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. तसेच त्यांनी गांडेय मतदारसंघात पोटनिवडणूक जिंकून राजकीय करिअरची जोरदार सुरूवात केली. मागील काही महिन्यात त्यांनी जोरदार भाषणे दिली आणि पक्षात एक महिला नेता म्हणून स्वतः ला प्रस्थापित केले.
आता जर या निवडणुकीत इंडिया आघाडीने झारखंड विधानसभा पुन्हा विजय मिळवला तर यात कल्पना सोरेन यांची महत्त्वाची भूमिका असेल. कारण त्यांनी लोकांत जाऊन झामुमो आणि इंडिया आघाडीला बळकट करण्याचं काम केलं आहे.