मुख्यमंत्रीच हरवले आहेत! 24 तासांपासून हेमंत सोरेन नॉट रिचेबल, स्टाफचे फोनही बंद

मुख्यमंत्रीच हरवले आहेत! 24 तासांपासून हेमंत सोरेन नॉट रिचेबल, स्टाफचे फोनही बंद

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी (ED) कारवाईची टांगती तलवार असलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) 24 तासांपासून संपर्काबाहेर आहेत. काल (29 जानेवारी) दिल्लीत आल्यानंतर ते कुठे गेले याबाबत कोणालाच कल्पना नाही. त्यांच्या सर्व स्टाफचे फोनही बंद लागत असल्याची माहिती आहे. याशिवाय त्यांचे चार्टर्ड विमान दिल्ली विमानतळावर उभे आहे, त्यामुळे मुख्यमंत्री नेमके गेले कुठे असा सवाल विचारला जात आहे. (Jharkhand Chief Minister Hemant Soren has been not reachable form 24 hours.)

झारखंडमधील कथित जमीन फसवणुकीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढत आहेत. जबाब नोंदवण्यासाठी ईडी त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सोरेन यांनी ईडीला पत्र लिहून राजकीय अजेंड्यानुसार कारवाई केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) आपल्या आणि आघाडीच्या आमदारांना रांचीमध्येच राहण्यास सांगितले आहे.

‘400 च काय 200 जागाही अशक्य, प्रभू श्रीराम भाजपाला माफ करणार नाही’; राऊतांचा घणाघात

झारखंड मुक्ती मोर्चाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते विनोद कुमार पांडे यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सत्ताधारी आघाडीच्या सर्व आमदारांना रांचीमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल हे सत्ताधारी आघाडीचे सदस्य आहेत. मात्र मुख्यमंत्री सोरेन कुठे आहेत याबाबत त्यांनी बोलणे टाळले.

सोरेन यांनी पत्रात काय म्हटले आहे?

झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांनी ईडीला पाठवलेल्या पत्रात म्हटले की, “आपल्या कल्पना आहे की झारखंड विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन ते 29 फेब्रुवारी या दरम्यान पार पडणार आहे, इतर पूर्वनियोजित कामांव्यतिरिक्त, मी याच अधिवेशनाच्या तयारीत व्यस्त आहे. त्यामुळे 31 जानेवारी 2024 ला किंवा त्यापूर्वी दुसरा जबाब नोंदविण्यासाठी तुम्ही बोलवणे चुकीचे आहे. यातून राज्य सरकारच्या कामकाजात अडथळा आणण्याचा आणि जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीला त्याचे अधिकृत कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याचा तुमचा राजकीय अजेंडा उघड होतो, असाही आरोप सोरेन यांनी केला.

“आमच्याकडे ‘मित्र’ वाढल्याने अडचण” महाजनांच्या नाराजीवर फडणवीस म्हणाले, गिरीशभाऊ तुम्हीच…

कथित जमीन फसवणूक प्रकरणात मनी लाँड्रिंग संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) एक पथक सोमवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले होते. ईडीने जवळपास 13 तासांहून अधिक काळ इथे झाडाझडती केली, तपास केला. शोध यापूर्वी 20 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने हेमंत सोरेन यांची त्यांच्या रांची येथील शासकीय निवासस्थानी चौकशी केली होती. त्यानंतर, ईडीने नवीन समन्स जारी करुन त्यांना 29 जानेवारी किंवा 31 जानेवारी दरम्यान कोणत्या दिवशी चौकशीसाठी येणार हे सांगण्यास सांगितले होते.

हेमंत सोरेन कुठे आहेत?

याच चौकशीसाठी काल सकाळी सोरेन दिल्लीत दाखल झाले. मात्र दिल्लीत आल्यानंतर ते नेमके कुठे आहेत याची कोणालाच कल्पना नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे चार्टर्ड विमानही दिल्ली विमानतळावर उभे आहे. त्यांच्या  सर्व स्टाफचे फोनही बंद आहेत. काल (सोमवार) ईडीने त्यांची बीएमडब्ल्यू कार जप्त केली होती. त्यांच्या ड्रायव्हरचीही चौकशी करण्यात आली, मात्र सोरेन यांच्याबाबत काहीही निष्पन्न झाले नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube