उत्तरेच्या पॉलिटिक्समधूनच दक्षिणचं ‘उत्तर’; भाजपाच्या ‘दक्षिण’ उदयाचा धक्का कुणाला?

उत्तरेच्या पॉलिटिक्समधूनच दक्षिणचं ‘उत्तर’; भाजपाच्या ‘दक्षिण’ उदयाचा धक्का कुणाला?

Lok Sabha Elections 2024 Exit Poll : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर लगेचच एक्झिट पोल आले. या पोलमध्ये भाजप नेतृत्वातील एनडीए पुन्हा सरकार स्थापन करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. फक्त उत्तर भारतच नाही तर दक्षिण भारतातूनही भाजपला गुडन्यूज मिळाली. ज्या दक्षिण भारतात कमळ फुलवण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले त्याच दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशात काही जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला. एका अर्थाने या निवडणुकीने भाजपसाठी केरळ आणि तामिळनाडू या राज्यांचे दरवाजे उघडले गेले असे म्हणण्यास हरकत नाही.

बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपला दक्षिण भारतात काही जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या ठिकाणी पक्षाला जरी जागा मिळाल्या नाही तरीदेखील भाजपची मते वाढण्याची शक्यता आहेच. ही गोष्ट सुद्धा भाजपसाठी फायद्याचीच ठरणार आहे. भाजपकडून हिंदुत्वाचं राजकारण केलं जातं असल्याचा विरोधकांचा नेहमीचा आरोप आहे. या राजकारणाच्या आधारावर भाजप उत्तर भारतात तर जिंकतो पण दक्षिणेत काही शिरकाव होत नाही.

उत्तरेच्या राजकारणातच शोधलं दक्षिणचं उत्तर

पण यावेळेस भाजपने वेगळच राजकारण केलं आहे. उत्तर भारतातूनच दक्षिण भारतातील राजकारणाचा मार्ग भाजपने शोधून काढला आहे. याआधी भाजपने स्वतःला पूर्व आणि पश्चिम भारतात स्थापित केलं आहे. आताच्या निवडणुकीतही भाजप या भागात मजबूत दिसत आहे. आता जे एक्झिट पोल आले आहेत त्यातून भाजप कार्यकर्त्यांत नवा उत्साह भरला गेला आहे मात्र विरोधकांनी हे पोल नाकारले आहेत.

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपची हॅट्रीक, एकहाती सत्ता खेचणारे पेमा खांडू आहेत तरी कोण?

तेलंगाणा-आंध्रात मोठा उलटफेर?

भाजप यंदा कमकुवत होईल असा त्यांचा दावा आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे तसेच दक्षिण भारतातही जागा मिळतील असा अंदाज आहे. एक्झिट पोलवर विश्वास ठेवला तर एनडीएला या राज्यांमध्ये 51 ते 54 जागा मिळतील. एकट्या भाजपाचा विचार केला तर येथे 34 ते 36 जागा मिळू शकतात. सन 2019 च्या निवडणुकीत दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये भाजपला 29 जागा मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे यंदा केरळमध्ये भाजपचे खाते उघडताना दिसत आहे. येथे भाजपला 1 ते 3 जागा मिळू शकतात. तामिळनाडू आणि पुदूच्चेरी मधील 40 जागांपैकी एनडीएला 1 ते 3 जागा मिळू शकतात. 2019 मध्ये भाजपने तामिळनाडूत पाच जागांवर उमेदवार दिले होते पण यातील एकही उमेदवार जिंकू शकला नाही.

कर्नाटक भाजप विन विन परिस्थितीत

कर्नाटकचा विचार केला तर इथे भाजपला मोठा फायदा होताना दिसत आहे. बहुतांश एक्झिट पोलनुसार राज्यातील 28 जागांपैकी 23 ते 26 जागा एनडीएला मिळू शकतात. 2019 मध्ये भाजपने 25 जागा जिंकल्या होत्या. एक्झिट पोलनुसार आंध्र प्रदेशात एनडीएला 19 ते 22 जागा मिळू शकतात. एकट्या भाजपला येथे 4 ते 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत येथे भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती. तेलंगणाबद्दल बोलायचे झाले तर भाजपला येथे 7 ते 10 जागा मिळू शकतात. 2019 मधील निवडणुकीत भाजपने येथे 17 जागांवर उमेदवार दिले होते त्यातील 4 जागांवर विजय मिळाला होता.

K Annamalai : भाजपच्या चाणक्याला ‘बड्डे’ च्या दिवशीच मिळणार खासदारकीचं गिफ्ट

भाजपाच्या दक्षिण उदयाचा धक्का कुणाला?

जर दक्षिण भारतात भाजप सेट होत गेला तर येथील प्रादेशिक पक्षांसाठी ही धोक्याची घंटाच ठरेल. द्रविड पक्षांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता राहील. डीएमके आणि एआयएडीएमके या पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अधिक मजबूत होण्याची गरज आहे. तामिळनाडूत के. अन्नामलाई यांच्या नेतृत्वात भाजप उदयास येताना दिसत आहे. तसेच अन्नामलाई सुद्धा राज्यात भाजपाचा मोठा नेता म्हणून समोर येत आहेत. दक्षिणेतील नेते केंद्र सरकारकडून निधी मिळत नसल्याची तक्रार नेहमीच करत असतात. पण जर या राज्यांत भाजप मजबूत झाला तर ही तक्रारही निकाली निघेल.

आंध्र प्रदेशात भाजप वायएसआरसीपीला मोठा झटका देताना दिसत आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना आपली लोकप्रियता टिकवून ठेवायची असेल तर जास्त काम करावे लागणार आहे. परंतु, येथे भाजप टीडीपी अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू आणि जनसेना प्रमुख पवन कल्याण यांना सोबत घेत मोठा उलटफेर करू शकतो असा अंदाज आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज