कर्नाटक जिंकलं आता मध्य प्रदेश टार्गेट; ‘हा’ नेता करणार काँग्रेसचा इलेक्शन प्लॅन

कर्नाटक जिंकलं आता मध्य प्रदेश टार्गेट; ‘हा’ नेता करणार काँग्रेसचा इलेक्शन प्लॅन

Madhya Pradesh : कर्नाटकातील प्रचंड यशानंतर काँग्रेसने (Karnataka Election) आता आपला मोर्चा मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडकडे वळवला आहे. कर्नाटकात काँग्रेसला सत्तेपर्यंत घेऊन जाणारे डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) आता मध्य प्रदेशच्या निवडणुकीतही दिसतील. तशी खास रणनिती काँग्रेसने तयार केली आहे. मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ (Kamalnath) यांच्याबरोबर ते निवडणूक व्यवस्थापनाचे काम पाहतील असे सूत्रांचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेशातील प्रमोद तिवार आणि हरियाणाचे दीपेंद्र हुडा हे सु्द्धा मध्य प्रदेशात असतील. अन्य काही राज्यातील नेतेही असतील. ज्या जागा काँग्रेसला जिंकता आल्या नाहीत अशा जागांची जबाबदारी या नेत्यांकडे देण्यात येणार आहे. दुसरीकडे काँग्रेस मध्यप्रदेशात कर्नाटकातील सर्वोत्तम निवडणूक पद्धती आजमावण्याच्या तयारीत आहे. आगामी काळात पक्ष भ्रष्टाचारावरून जोरदार हल्लाबोल करणार आहे. PAYCM पोस्टर मोहिमेची काही नवीन आवृत्ती मध्ये प्रदेशात दिसण्याची शक्यता आहे.

खासदार ड्रायव्हर, मंत्री गाडीत तरीही बागेश्वर बाबाला दणका बसलाच; पोलिसांची कारवाई

PayCM म्हणजे काय?

कर्नाटकात काँग्रेसने निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपवर 40 टक्के कमिशनचा आरोप केला. तत्कालीन मुख्यमंत्री बोम्मई यांच्या फोटोसह अशी पोस्टर्स लावली होती. ज्यावर ‘PayCM पोस्टर कॅम्पेन’ असे लिहिले होते. पोस्टर्सवर बोम्मई यांचा चेहरा असलेला QR कोड होता आणि सरकारविरोधातील कथित भ्रष्टाचार उघड करण्यासाठी काँग्रेसने सुरू केलेला एक हेल्पलाइन नंबरही होता.

कर्नाटकात काँग्रेसला विजय मिळवून देण्यात डी. के. शिवकुमार यांनी महत्वाची भूमिका बजावली. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना भाजपने ते सरकार पाडले. त्यानंतर पुढील तीन वर्षांच्या काळात शिवकुमार यांनी मेहनत घेत काँग्रेसला पुन्हा उभे केले. त्यांच्या रणनितीचा काँग्रेसला मोठा फायदा झाला. आता काँग्रेसने त्यांची ही स्ट्रॅटेजी अन्य निवडणूक राज्यातही आजमावण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. कारण, 2020 मध्ये जेव्हा ज्योतिरादित्य सिंधिया गटातील बंडखोर आमदार बंगळुरूतील एका हॉटेलमध्ये होते. तेव्हा माजी मु्ख्यमंत्री दिग्विजय सिंह या नेत्यांना शांत करण्यासाठी आणि पुन्हा माघारी बोलावण्यासाठी कर्नाटकात आले होते. त्यावेळी शिवकुमार यांनी दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांना मदत केली होती.

काँग्रेस मीडिया विभागाच्या उपाध्यक्षा संगिता शर्मा यांनीही याला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या, निवडणूक काळात काँग्रेस नेते मध्य प्रदेशात दिसतील. डी. के. शिवकुमार हे सुद्धा आगामी काळात राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, या सर्व नेत्यांचा दौरा केव्हा सुरू होणार किंवा ते प्रचाराचे काम केव्हा हाती घेणार, हे तूर्तास निश्चित झालेले नाही. लवकरच सर्व नेत्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल.

Chief Minister of Karnataka : सिद्धरामय्या मुख्यमंत्री होण्यामागचं ‘पंचामृत’…

भाजपाच्या स्ट्रॅटेजीवर काँग्रेस 

काँग्रेसने यंदा भाजपप्रमाणेच विधानसभेच्या 230 पैकी 1-1 जागेवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळेच पक्षाने निवडणुकीची जबाबदारी राष्ट्रीय नेत्यांवर सोपविली आहे. दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा यांच्याकडे भोपाळची जबाबदारी देण्यात आली आहे. महाकौशल आणि विंध्य यांची जबाबदारी उत्तराखंड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप टमटा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ग्वाल्हेर-चंबळ विभागातील गुणा, शिवपुरी आणि अन्य जागा ज्यांवर सलग तीन ते पाच निवडणुकांत काँग्रेसचा पराभव होत आहे. या जागांची जबाबदारी हिमाचल प्रदेशच्या कुलदीप राठोड यांच्याकडे दिली आहे. गुजरातचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोरवाडिया यांनी माळवा आणि निमारच्या पराभूत जागांची जबाबदारी दिली आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी 12 जून रोजी जबलपूर येथून रोड शो आणि जाहीर सभा घेणार आहेत. या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या मोहिमेलाही सुरुवात होईल. यानंतर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभांची तयारी पक्षाकडून केली जात आहे. सध्या प्राथमिक चर्चा झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथही निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube