‘सीपीआर’ उपराष्ट्रपती झाले तर, क्रेडिट फडणवीसांना जाणार?; पडद्यामागे नेमकं गणित कसं फिरलं..

‘सीपीआर’ उपराष्ट्रपती झाले तर, क्रेडिट फडणवीसांना जाणार?; पडद्यामागे नेमकं गणित कसं फिरलं..

Vice President Election CP Radhakrishnan : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं चित्र आता (Vice President Election) स्पष्ट झालं आहे. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांची तर विरोधी इंडिया आघाडीने (INDIA Alliance) बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. नावाची घोषणा झाल्यानंतर राधाकृष्णन यांनी तडक दिल्ली गाठली. आता राज्यसभा आणि लोकसभेतील संख्याबळ पाहिलं तर राधाकृष्णन विजयी होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे इंडिया आघाडी काहीशी मागे पडल्याचे दिसत आहे.

ज्यावेळी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा झाली त्यावेळी अनेकांना धक्का बसला. कारण या पदासाठी त्यांचं नाव चर्चेतही नव्हतं. राजकीय वर्तुळात वेगळीच नावं चर्चिली जात होती. आता राधाकृष्णन यांचं नाव कसं निश्चित झालं यामागे काय घडलं याचा प्रत्येक जण आपापल्या परीने शोध घेत आहे. मात्र राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार बनवण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जात आहे.

सीपी राधाकृष्णन भाजपाचा हुकूमी एक्का; दक्षिणेचं पॉलिटिक्स अन् इंडिया आघाडीत फूट?

राज्याच्या राजकारणात सध्या वेगळीच चर्चा सुरू आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या शोधात देवेंद्र फडणवीस यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनीच सर्वात आधी राधाकृष्णन यांचं नाव सुचवल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे इंडिया आघाडीत फूट पाडली जाईल आणि तामिळनाडूतील सत्ताधारी डीएमकेला खिंडीत गाठता येईल असं गणित फडणवीसांनी मांडलं होतं. सूत्रांनी सांगितलं की हा विचार जेव्हा भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वासमोर आला आणि उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली त्यावेळी फडणवीस यांनी सुचवलेलं नाव योग्य ठरलं. ज्यावेळी भाजप नेतृत्वाकडून उमेदवाराचा शोध घेतला जात होता त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्णन यांचं नाव सुचवलं होतं.

फडणवीसांचं वजन वाढतंय

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत युतीने शानदार विजय मिळवला. यात देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा होता. या यशानंतर राजकारणात त्यांचं वजन वाढलं आहे. पीएम मोदी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही त्यांना वरदहस्त आहे. एनडीतील घटक पक्षांनी उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्याचा निर्णय पीएम मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर सोपवला होता.

राधाकृष्णन संघाचे जुने आणि एकनिष्ठ स्वयंसेवक आहेत त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला कुणाचाही विरोध होणार नाही अशी अटकळ होतीच. शिवाय यातून भाजप आणि संघातील नातं अधिक बळकट होईल असाही विचार होता. दोघांतील संवाद, समन्वय आणि नाते चांगले राहाणं हे आगामी बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू निवडणुकांच्या दृष्टीनेही महत्वाचं होतं.

मिशन साउथचा अन्वयार्थ

जर सीपी राधाकृष्णन या निवडणुकीत विजयी झाले तर वैंकय्या नायडू यांच्यानंतर ते दक्षिण भारतातून भाजपाचे दुसरे उपराष्ट्रपती ठरतील. याआधी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती करण्यात आलं होतं. जर राधाकृष्णन उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार असतील तर दक्षिणेतील पाच राज्ये त्यांचं समर्थन करू शकतात असा दावा फडणवीस यांनी केला होता. तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकलाही त्यांचा विरोध करणं सोपं राहणार नाही. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष देखील त्यांना विरोध करू शकणार नाहीत कारण राधाकृष्णन सध्या राज्याचे राज्यपाल आहेत.

महाराष्ट्र निवडणुकीत मॅच फिक्सिंग? CSDS च्या संजयकुमारांकडून ट्विट डिलीट; माफीही मागितली

follow us
  • fb
  • instagram
  • youtube