सीपी राधाकृष्णन भाजपाचा हुकूमी एक्का; दक्षिणेचं पॉलिटिक्स अन् इंडिया आघाडीत फूट?

Vice President Election CP Radhakrishnan : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी कशा पद्धतीने राजीनामा दिला? पडद्याआड काय राजकारण झालं? धनखड नेमके कोणते डाव टाकत होते? ज्या विरोधी पक्षाने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला त्याच विरोधी पक्षांना धनखड इतके कसे चांगले वाटू लागले? आणि सत्ताधारी भाजपला का खटकू लागले? याची उत्तरं जो तो आपापल्या परीने शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण राजकारण गतीमान असतं. निवडणुकीच्या काळात तर अधिक गतिमान होतं. त्यानुसार आता उपराष्ट्रतिपदाच्या निवडणुकीचे (Vice President Elections) पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीए आघाडीने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांच्या नावाची घोषणा केली. पण, राधाकृष्णनच का? या पदासाठी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याचं कारण काय? यातून कोणता संदेश देण्याचा प्रयत्न होतोय, जाणून घेऊ..
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांनी राधाकृष्णन यांना ‘गुड पर्सन इन राँग पार्टी’ असं म्हटलं होतं. परंतु, या गोष्टी राजकारणातल्या झाल्या. सीपी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर होण्यामागेही असंच राजकारण आहे. खरंतर भाजपनं या माध्यमातून एक मोठा डाव टाकलाय. विरोधी इंडिया आघाडीत फुटीचं (INDIA Alliance) बीजारोपण करण्याचं काम या माध्यमातून झालं आहे. पण ते कसं अगदी सोप्या शब्दांत समजून घेऊ या..
जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. यानंतर उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार कोण असेल याचं उत्तर मिळालं. कोणाच्याही फारसे चर्चेत नसलेले महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव एनडीएने फायनल केलं. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या नावाला एनडीएतील सर्व घटक पक्षांचा पाठिंबा होता. परंतु, त्यांच्याच नावाचा विचार का झाला या प्रश्नाचं उत्तर मिळवू या.
विरोधी पक्षाचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरला! सी.पी. राधाकृष्णनांना टक्कर देणार ‘हा’ दिग्गज नेता
सर्वात महत्वाचं म्हणजे याआधीचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध नव्हता. भाजपात आल्यानंतर भाजपाने त्यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाची जबाबदारी दिली होती. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी जे काम केलं त्या बदल्यात त्यांना थेट उपराष्ट्रपती पदी संधी मिळाली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या अपेक्षाकृत त्यांचं कामकाज राहीलं नाही.
पण आताचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार राधाकृष्णन 24 कॅरेट सोनं आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांची राजकीय कारकिर्द पाहिली तर त्यांच्यावर डाऊट घेण्याचं कोणतंही कारण दिसत नाही. राधाकृष्णन आज 66 वर्षांचे आहेत. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच संघाच्या शाखेत जाण्यास सुरुवात केली होती. त्यांनी तामिळनाडू सारख्या राज्यात ज्या ठिकाणी भाजपाचं काहीच अस्तित्व नाही त्याठिकाणी पक्षाचं काम केलं. दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले.
नंतर ज्यावेळी त्यांचा सातत्याने पराभव होऊ लागला तेव्हा 2014 भाजपाने सरकार आल्यानंतर त्यांना क्वायर बोर्डाचे चेअरमन म्हणून शेजारच्या केरळ राज्यात नियुक्ती दिली. या काळातही त्यांनी पक्षाचं काम केलं. आंध्र प्रदेशच्या निवडणुकीतही त्यांच्याकडे मोठी जबाबदारी होती. तामिळनाडूत भाजपाला राधाकृष्णन यांची गरज कायम जाणवत राहिली. परंतु, अचानक त्यांना उपराष्ट्रपती पदाची ऑफर देणं यामागे विचारपूर्वक तयार केलेली रणनिती नक्कीच आहे.
राज्यपालांना प्रमोशन, भाजपाचं तंत्र
एक गोष्ट स्पष्ट आहे. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर त्यांच्याकडून कोणत्या ना कोणत्या राज्यपालालं प्रमोट करण्याचं काम होत आलं आहे. सर्वात आधी बिहारचे राज्यपाल असलेले रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदी संधी दिली. विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यादेखील राष्ट्रपती होण्याआधी झारखंडच्या राज्यपाल होत्या. जगदीप धनखडही आधी पश्चिम बंगालचे राज्यपाल होते नंतर त्यांना उपराष्ट्रपती केलं. आताचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन देखील महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्यात आणखीही काही गुण आहेत.
तसेच यामागे मोठे पॉलिटिक्सही दिसते. तामिळनाडूत लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यात भाजपाने सत्तेत येण्यासाठी अनेक प्रयोग केले. आताही येथील स्थानिक पक्षाच्या खांद्यावर हात ठेऊन भाजपाची वाटचाल सुरू आहे. राधाकृष्णन यांचे एआयएडीएमकेशी चांगले संबंध आहेत. याच पक्षाशी भाजपने निवडणुका लढाव्यात या मताचे ते आहेत. आता त्यांनी उमेदवार करून आम्ही तामिळनाडूत आघाडीच्या राजकारणाला तयार आहोत असा संदेश भाजपने दिला आहे.
तामिळनाडूत भाजपाचं सोशल इंजिनिअरिंग
दक्षिण भारताचं राजकारण पाहिलं तर येथील मुख्यमंत्र्यांनी कधीही त्यांच्यापेक्षा मोठ्या पदासाठी आपल्या पक्षातून कुणा नेत्याला प्रमोट केलं नाही. भाजपने मात्र ही परंपरा तोडली. तामिळनाडूतून आता तिसरा व्यक्ती उपराष्ट्रपती पदावर येणार आहे. राधाकृष्णन यांच्या माध्यमातून भाजपने येथे सोशल इंजिनिअरिंगचाही प्रयत्न केला आहे. तामिळनाडूत आम्ही जिंकत नसलो, सत्तेत येत नसलो तरीही आम्हाला येथील लोकांची काळजी आहेत. राज्यातील व्यक्तीला आम्ही थेट उपराष्ट्रपती पदापर्यंत नेऊ शकतो असा मेसेज भाजपने तामिळनाडूतील जनतेला दिला आहे.
धनखड अन् मलिकांचा प्रयोग फेल
विशेष म्हणजे सीपीआर संघाच्या मुशीत तयार झालेले आहे. संघाचे एकनिष्ठ आहेत. तरी देखील मोदी सरकारने त्यांना मंत्रिमंडळात संधी दिली नव्हती. त्यांनी बाहेरून आलेले सत्यपाल मलिक आणि जगदीप धनखड यांना मोठी पदे दिली. परंतु, त्यांचा हा प्रयोग सपशेल अपयशी ठरला. आता त्यांनी पुन्हा संघाच्या आश्रयाला जाण्याचा निर्णय घेतला. कारण संघशक्ती हेच भाजपाचं टॉनिक आहे. संघाकडे दुर्लक्ष करणं किंवा संघ नेत्यांचा मतांचा विचार न करण्याचा काय परिणाम होतो याचा अनुभव भाजपाने लोकसभा निवडणुकीत घेतला होता. आता भाजप नेते संघाला सोबत घेत वाटचाल करत आहेत. राधाकृष्णन हे याचं आणखी एक उदाहरण म्हणता येईल.