लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या विचारांनी देशाला दिशा दिली; पुणे वीरांची भूमी -अजित डोवाल
छत्रपती शिवाजी महाराजांपासून महर्षी धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर यांसारख्या महान व्यक्तींनी समाजाला आणि राष्ट्राला नवी दिशा दिली आहे.
स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जनतेमध्ये स्वराज्याची प्रबळ जाणीव निर्माण केली. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,” या त्यांच्या घोषणेने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी केले. पुण्यात आयोजित समारंभात डोवाल यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
लोकमान्य टिळक यांच्या विचारांमध्ये राष्ट्रहिताची स्पष्ट दिशा दिसून येते. स्वराज्याच्या ध्येयासाठी त्यांनी पारतंत्र्याविरुद्ध अखंड संघर्ष केला आणि देशवासीयांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागवली, असे डोवाल यांनी नमूद केलं. तसंच, पुढं बोलताना त्यांनी पुण्याच्या ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानाचाही गौरव केला. “पुणे ही वीरांची आणि विचारवंतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून महर्षी धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर यांसारख्या महान व्यक्तींनी समाजाला आणि राष्ट्राला नवी दिशा दिली आहे.
पुढं बोलताना डोवाल म्हणाले, ७६ वर्षांपूर्वी माझ्या वडिलांच्या बदलीच्या निमित्ताने मी पहिल्यांदा पुण्यात आलो होतो. माझ्या शालेय शिक्षणाची सुरुवातच याच मातीतून झाली. पुण्याशी माझा एक छोटासा पण अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
पुण्यातील आपल्या बालपणीचे दिवस आठवताना अजित डोवाल म्हणाले, मी लहान असताना एक ते दीड वर्ष पुण्यात होतो. त्यावेळच्या दोन गोष्टी माझ्या आजही स्पष्ट लक्षात आहेत. एक म्हणजे, दर मंगळवारी मला चतुःशृंगी देवीच्या दर्शनाला घेऊन जायचे आणि तिथे देवीला दाखवलेला प्रसाद आम्हाला खायला मिळायचा असंही ते म्हणाले.
त्याचबरोबर माझ्या आयुष्यात मला लोकमान्य टिळकांची पहिली ओळख पुण्याच्या मातीत माझ्या हिंदीच्या शिक्षकांमुळंच झाली. आज अनेक वर्षांनंतर त्याच मातीत लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझं खूप मोठं भाग्य आहे असंही ते म्हणाले.
लोकमान्य टिळकांच्या महान कार्याचा गौरव करताना डोवाल पुढे म्हणाले, महाराष्ट्र ही शूरवीरांची आणि क्रांतीची भूमी आहे. ज्या काळात पारतंत्र्याविरोधात आवाज उठवण्याची हिंमत कोणामध्ये नव्हती, त्या अत्यंत कठीण परिस्थितीत लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा हुंकार भरला.