बिहारच्या राजकारणातील पलटूराम : नितीशकुमार चौथ्यांदा पलटी मारण्याच्या तयारीत…
असे म्हणतात की राजकारण आणि विचारधारा या एकमेकांचा हात हातात धरुन समांतर चालणाऱ्या दोन गोष्टी. दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न असतात. उदाहरण द्यायचेच झाले तर जशी भाजपची विचारधारा हिंदुत्ववादी तर काँग्रेसची सर्वधर्मसमभाव अशी आहे. याच विचारधारेमुळे तुम्ही निवडणुकीमध्ये लोकांपुढे कोणते मुद्दे घेऊन जाणार, लोक तुम्हाला का मते देणार, लोक तुमच्यावर का विश्वास ठेवणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होते. पण या गोष्टीला तिलांजली देत राजकारण आणि विचारधारा दोन गोष्टींचा दूर दूर पर्यंत कोणताही संबंध नाही, हे वारंवर सिद्ध करणारे नेते म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव घ्यावे लागते.
नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मागील दहा वर्षांमध्ये भाजपची (BJP) चौथ्यांदा पलटी मारण्याच्या तयारीत आहे. कदाचित त्यामुळे बिहारच्या (Bihar) राजकारणात त्यांना पलटूराम असे म्हणतात. यापूर्वी नितीश कुमार यांनी दोनवेळा भाजपची साथ सोडत राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केले होते. पण आता ते पुन्हा भाजपच्या जोडीने सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात भूकंप आला आहे. येत्या 28 जानेवारी रोजी त्यांचा भाजपाबरोबर शपथविधी होईल अशा चर्चा माध्यमांतून सुरू झाल्या आहेत.
नितीश कुमार यांनी यापूर्वी कधी कधी मारली?
2013 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली. हा निर्णय नितीश कुमार यांना पसंतीस पडला नाही. त्यांनी सुरुवातीला या निर्णयाचा तीव्र विरोध सुरु केला. त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत मध्ये भाजपची साथ सोडून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. हीच त्यांची पहिली पलटी ठरली. त्यानंतर वर्षभरातच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा प्रचंड विजय झाला. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने 40 पैकी 38 जागांवर निवडणूक लढवली होती. पण त्यांना केवळ दोन जागा जिंकण्यात यश आले.
‘इंडिया’ आघाडी सोबत राहिले तर नितीश कुमार PM…; अखिलेश यादव स्पष्टचं बोलले
या मानहानीकारक पराभवाचा नितीश कुमार यांनी चांगलाच धसका घेतला. मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीच त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी जीतनराम मांझी यांना खुर्चीवर बसविले. त्यावेळी 117 जागांसह संयुक्त जनता दल काठावरच्या बहुमतात होता. शिवाय लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने मांझी यांना पाठिंबा दिला आणि विधानसभेतील बहुमत चाचणी जिंकली. इथेच राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल आणि काँग्रेसची युती झाली.
याच महागठबंधनने 2015 मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक लढविली. या आघाडीने घवघवीत यश मिळवत 178 जागांवर विजय मिळविला. या महागठबंधनमध्ये जनता दल यूनाइटेड (जदयू), राष्ट्रीय जनता दल (राजद), कांग्रेस, जनता दल, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, इंडियन नॅशनल लोक दल और समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय) अशा पक्षांचा समावेश होता.
दुसरी पटली :
नितीश कुमार यांनी दुसरी पलटी मारली 2017 मध्ये. सीबीआयने लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या नातेवाईकांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केले. कुमार यांनी सीबीआय आरोपपत्रात नाव असलेल्या आणि त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितला. पण त्यांनी राजीनामा देण्यास दिला आणि कुमार यांनी पुन्हा भाजपशी जाण्याचा निर्णय घेतला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलासोबतचे महागठबंधन तोडले. ते भाजपच्या पाठिंब्याने पुन्हा मुख्यमंत्री झाले.
लालू यादवांचा मोठा डाव : सत्ता कायम ठेवण्यासाठी थेट भाजपच्या मित्रपक्षालाच उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर
2020 मधील बिहार विधानसभेच्या निवडणुकाही भाजप आणि संयुक्त जनता दल सोबतच लढले. पण भाजपने संयुक्त जनता दलाच्या उमेदवारांविरोधात बंडखोर उमेदवार उभे करत आपल्या जागा कमी केल्या असल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केला. तिथूनच्या त्यांच्या भाजपसोबतच्या कुरबुरी सुरु झाल्या होत्या. 2021 मधील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराने या कुरबुरीला आणखी हवा दिली. नितीश कुमार यांनी केंद्रात तीन मंत्रिपदांची मागणी केली होती. पण भाजपने त्यांना एकच मंत्रिपद दिले होते.
तिसरी पलटी :
त्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी भाजपसोबत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. भाजपने कायम आपला आणि आपल्या पक्षाचा अपमान केला. भाजपने संयुक्त जनता दल फोडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत नितीश कुमार यांनी ऑगस्ट 2022 मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दलासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तिथून त्यांनी देशांतर्गत राजकारणाच्या दृष्टीने विरोधकांची एकजूट करण्यात सुरुवात केली. त्यांच्याच पुढाकाराने इंडिया आघाडीची स्थापना झाली.
चौथी पलटी :
पण आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाला सोडण्याचा आणि भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय जवळपास अंतिम केला आहे. यामुळेच नितीश कुमार-राजकारण आणि विचारधारा या गोष्टींचा दुरान्वयेही संबंध नाही असे म्हणावे लागेल.