न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना दिला मोठा दिलासा; आता ‘इतके’ पैसे काढता येणार

New India Co-operative Bank : आरबीआयने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना 25,000 रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Bank) भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या ठेवीदारांना 27 फेब्रुवारी 2025 पासून प्रति खातेदार 25,000 रुपये काढण्याची परवानगी दिली आहे.
मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; बंगालच्या उपसागरात घटनेचा केंद्रबिंदू
सेंट्रल बँकेने सुमारे दोन आठवड्यांपूर्वी या बँकेवर कठोर निर्बंध लादले होते, ज्यामध्ये पैसे काढण्यावर पूर्ण बंदी देखील घालण्यात आली होती. बँकेच्या तरलता आणि आर्थिक स्थिरतेबद्दल चिंता व्यक्त झाल्यामुळे 13 फेब्रुवारी 2025 रोजी, RBIने बँकेवर निर्बंध लादले होते, ज्यामुळे ठेवीदार बँकेतून पैसे काढू शकत नव्हते.
किती पैसे काढण्याची परवानगी?
आता बँकेच्या रोख स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मध्यवर्ती बँकेने अंशतः दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. RBI ने म्हटले आहे की 50% पेक्षा जास्त खातेदार त्यांच्या संपूर्ण ठेवी काढू शकतील. ज्या खातेदारांची ठेव रक्कम 25,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे ते संपूर्ण रक्कम काढू शकतील. ज्यांची शिल्लक 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे ते जास्तीत जास्त 25,000 रुपये काढू शकतात.
एटीएममधून पैसे काढता येणार
आरबीआयने यापूर्वी बँकेचे बोर्ड बरखास्त केले होते आणि प्रशासक आणि सल्लागार समितीची नियुक्ती केली होती. आता या समितीची नव्या सदस्यांसह पुनर्रचना करण्यात आली आहे, ज्यात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि सारस्वत सहकारी बँकेच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आरबीआयने सांगितले की ते बँकेच्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. ज्या ग्राहकांना बँकेतून पैसे काढायचे आहेत ते न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक किंवा इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतात.
यापूर्वी बँकेचे सीईओ हितेश मेहता आणि धर्मेश पौन यांना अटक झाली होती. रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासणीनंतर निधीच्या कथित गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आले. बँकेतील अनियमिततेनंतर आरबीआयने बँकेवर सहा महिन्यांची बंदी घातली आहे. आरबीआयने बंदी घातल्यानंतर मुंबईतील बँकेच्या शाखेबाहेर खातेदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या होत्या. बँकेत खाते असणारा प्रत्येक खातेदार चिंतेत आहे. कुणाचे सोने गहाण ठेवले आहे तर कुणाचे पैसे बँक खात्यात अडकले आहेत.