तुमच्या मुलीचं लग्न झालं, मग इतर मुलींना संन्यासी बनण्याचं ज्ञान का?, जग्गी वासुदेवांना न्यायालयाचा सवाल

तुमच्या मुलीचं लग्न झालं, मग इतर मुलींना संन्यासी बनण्याचं ज्ञान का?, जग्गी वासुदेवांना न्यायालयाचा सवाल

Jaggi Vasudev : ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांना मद्रास उच्च न्यायालयाच्या एका गंभीर प्रश्नाचा सामना करावा लागत आहे. वासुदेव यांनी स्वतःच्या मुलीचे लग्न करून तिचं जीवन स्थिर केलं आहे. मात्र, ते इतर मुलींना संन्यासी बनण्यास प्रोत्साहित का करत आहेत?, असा सवाल मद्रास उच्च न्यायालयाने केला. (Jaggi Vasudev) जस्टिस एस.एम. सुब्रमण्यम आणि जस्टिस व्ही. शिवगनम यांच्या खंडपीठाने हा प्रश्न एक निवृत्त प्राध्यापकाच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान विचारला आहे.

प्राध्यापकाच्या मुलींचा आरोप-

निवृत्त प्राध्यापक एस. कामराज यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ज्यात त्यांनी दावा केला आहे की, त्यांच्या दोन उच्चशिक्षित मुलींना ईशा योग सेंटरमध्ये ‘ब्रेनवॉश’ करून ठेवलं आहे. 42 आणि 39 वयाच्या या मुलींनी कायमस्वरूपी सेंटरमध्ये राहणे निवडलं आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुलींच्या वडिलांनी न्यायालयाला विनंती केली आहे की, त्यांच्या मुलींशी संवाद साधावा.

न्यायालयाचा सवाल

मुलींनी न्यायालयासमोर हजेरी लावून असं सांगितले की, त्या स्वतःच्या इच्छेने सेंटरमध्ये राहत आहेत. परंतु, उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचा निर्णय घेतला. कारण, न्यायमूर्तींनी प्रकरणाच्या संबंधात काही शंका व्यक्त केल्या होत्या. न्यायमूर्ती शिवगनम यांनी आश्चर्य व्यक्त करत असं विचारले, “जे व्यक्ती स्वतःच्या मुलीचे लग्न करून तिचे जीवन स्थिर केले आहे, तो इतर मुलींना संन्यासी जीवन जगण्यास आणि डोक्याचे मुंडण करण्यास का प्रोत्साहित करत आहे?”

आज महात्मा गांधी जयंती! कोसो दूर अहिंसेची पाऊलवाट चालणारे बापू; काय होते जगण्याचे विचार?

ईशा फाउंडेशनच्या वकीलांनी न्यायालयासमोर असा तर्क दिला की, दोन स्वतंत्र वयस्क व्यक्तींना स्वतःचे जीवन ठरवण्याचा अधिकार आहे आणि त्यामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करू नये. परंतु, न्यायमूर्ती सुब्रमण्यम यांनी यावर उत्तर दिले, “आपण हे समजू शकणार नाही, कारण आपण एका पक्षाच्या वतीने हजर आहात. पण, हे न्यायालय कोणाच्याही पक्षात नाही, आम्ही फक्त न्याय करू इच्छितो.”

प्राध्यापकाचा गंभीर आरोप-

प्राध्यापक कामराज यांनी दावा केला आहे की, त्यांच्या मुलींना ईशा सेंटरमध्ये असे खाद्यपदार्थ आणि औषधे दिली जातात, ज्यामुळे त्यांच्या विचारशक्तीवर परिणाम झाला आहे. त्यांनी सांगितलं की, त्यांची मोठी मुलगी ब्रिटनमधून एम.टेकची पदवी घेतलेली असून ती पूर्वी चांगल्या पगाराच्या नोकरीत होती. 2008 मध्ये घटस्फोटानंतर तिने योगा क्लासेसला जाणं सुरू केलं. त्यानंतर लवकरच तिची धाकटी बहीणही कोयंबटूरच्या सेंटरमध्ये राहायला गेली.

न्यायालयाचा पुढील निर्णय अपेक्षित-

या प्रकरणात न्यायालयाने अधिक चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून, सद्गुरू जग्गी वासुदेव यांना या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं लागंल. न्यायालयाने हे प्रकरण समाजातल्या स्वतंत्र व्यक्तींना त्यांच्या जीवनाचे निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्याशी संबंधित मानले आहे आणि यावर अधिक खोलात जाऊन तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube